You are currently viewing समाजोन्नती संघटनेतर्फे चित्रा क्षीरसागर यांचा सन्मान करून अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

समाजोन्नती संघटनेतर्फे चित्रा क्षीरसागर यांचा सन्मान करून अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

पणजी:

धर्माभिमानी, धर्मसंरक्षक, राज्यातील प्रजेच्या हिताचे कार्य करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन काम करणाऱ्या ताळगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या व साहित्यिक चित्रा प्रकाश क्षीरसागर यांचा समाजोन्नती संघटनेच्या महिला आघाडीतर्फे शाल, श्रीफळ, भेटवस्तु, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित समारंभास साहित्यिक व निवृत्त ग्रंथपाल डॉ. बिभिषण सातपुते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाजोन्नती संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आकांक्षा चव्हाण यांच्या हस्ते सौ. क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला.

अहिल्यादेवीचे शौर्य व धाडस प्रशंसनीय आहे. आजच्या काळात त्यांच्या कामाचा आदर्श घेऊन प्रत्येक महिलेने कार्य करण्याची गरज आहे. मराठेशाहीचे कारभारी असलेल्या पेशव्यांना ठणकावून सांगण्याऱ्या व युध्दाविना पराभूत करणाऱ्या अहिल्यादेवींनी दानधर्मही भरपूर केला. ठिकठिकाणच्या मंदिरांचा जीर्णोध्दार केला असे डॉ. सातपुते म्हणाले. गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

सत्काराला उत्तर देताना चित्रा क्षीरसागर यांनी आपली कष्टमय प्रवास सांगितला. प्रत्येक काळात स्त्रीला विरोध आणि अपमान सहन करावा लागला. अहिल्यादेवींनी त्याकाळात आपल्या अतुल पराक्रमाने यश मिळवले, असे त्या म्हणाल्या. ताळगावात चपाती बनविण्याचे केंद्र असून अनेक महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. माहेश्वरी सिल्कसारखा उद्योग अहिल्यादेवींनी स्थापन केला व त्याद्वारे महिलांना स्वतःच्या पायावर उभे केले.

सौ. क्षीरसागर यांचे कार्यही महिलांसाठी प्रेरणादायी असून, त्यांनी महिलांचे संघटन मोठ्या प्रमाणावर केले आहे. महिलांना विविध उद्योग व व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी होण्यास मदत केली आहे, असे शंभू भाऊ बांदेकर म्हणाले. व्यासपीठावर संघटनेचे खजिनदार महेश चव्हाण, सचिव राजेश चव्हाण, समाजोन्नतीचे वरिष्ठ उपाध्यक्ष विराज बांदेकर, उपाध्यक्ष दामोदर कुडाळकर आदी उपस्थित होते. समाजाच्या सर्व थरातील स्त्री पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.

साहित्यिक पत्रकार प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांचा यावेळी पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितातील सौ. किरण कामत, नितीन कोरगावकर आदींना गुलाब पुष्प देण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार संगम भोसले यांनी सूत्रसंचालन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा