वृत्तसंस्था:
संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात घट झाली असून त्यामुळे थंडीचा कडाका आणखी वाढला आहे उत्तर भारतातही थंडीची लाट असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रात जाणवत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत तापमानाचा पारा घसरला असून थंडीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. राज्यात पुढील २४ तासांत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट अधिक जाणवत असून पारा चांगलाच घसरला आहे. तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात पारा घसरुन ९.२ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. तर मुंबईतील तापमान १६ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तसेच पुढील २४ तास थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून उत्तर भारतातील राज्यांसह महाराष्ट्रात तापमानात घसरण होत आहे. महाराष्ट्रासोबतच राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान येथेही थंडीची लाट पहायला मिळत आहे.