रमेश पवार तहसीलदार कणकवली यांचे प्रतिपादन
तळेरे
तळेरे, येथील विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीचे औचित्य साधून महाविद्यालयातील एनसीसी व एनएसएस विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘सुभाष दिवस’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पाहुणे म्हणून सुभेदार मेजर प्रकाश रॉय, प्रमुख पाहुणे म्हणून कणकवलीचे तहसीलदार रमेश पवार व अध्यक्षपदी डॉ.अनुराधा मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
भारताला, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने सर्वप्रथम स्वातंत्र्य मिळून दिले. म्हणून विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालय दरवर्षी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेला मानवंदना देते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्मदिन ‘सुभाषदिन’ म्हणून साजरा केला जातो व यादिवशी परेड स्पर्धा घेतली जाते. महाविद्यालयाचे मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी यांनी ही अभिनव संकल्पना महाविद्यालयात कार्यान्वित केली. या करिता 58 महाराष्ट्र बटालियन ओरोसचे सहकार्य लाभते.
कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार श्री. पवार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला हार घालून दिपप्रज्वलनाने केली. या प्रसंगी बोलतांना ते म्हणाले की, “आझाद हिंद सेनेची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली ही भारतवर्षासाठी फारच अभिमानास्पद बाब होती. नेताजींनी संपूर्ण जीवन देशसेवेसाठी वाहिले होते असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी 58 महाराष्ट्र बटालियनचे सुभेदार मेजर प्रकाश रॉय यांचा महाविद्यालयातर्फे चांदीचे नाणे, शाल, श्रीफळ देवून छोट्याखाणी सत्कार करण्यात आला. या वेळी बोलतांना ते म्हणाले की, ‘कदम कदम बढाये जाय खुशी के गीत गाये जाय’ असे म्हणत राष्ट्रीय छात्र सेनेंत पथसंचलन चे महत्व त्यांनी विषद केले.
ड्रिल कॉम्पिटीशनमुळे स्वयं शिस्त निर्माण होते.
ड्रिलच्या माध्यमातून सामुहीक शिस्तीचा गुण निर्माण होतो.दळवी काॅलेजच्या या उपक्रमाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. अनुराधा मुजुमदार यांनी नेताजींच्या स्वातंत्र्य चळवळी बद्दल माहिती दिली. स्वातंत्र्य लढ्यात नेताजीचे कार्य फार महत्वपूर्ण होते,असे सांगत त्यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विनायक दळवी यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली व आझाद हिंद सेनेची शौर्यगाथा विद्यार्थ्यांपुढे प्रकटवली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे सहा. प्रा.हेमंत महाडीक यांनी मानले. तर सूत्रसंचालन कु.दिक्षा सुतार हिने केले. बीएमएस विभागाचे प्रा. चेतन नेमन व बी कॉम विभागाच्या प्रा. सौ.मुग्धा कामत, एनसीसी केअर टेकर ऑफिसर यांनी कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.
:सुभाषचंद्र बोस जन्मदिनाचे औचित्य साधून तळेरेतील दळवी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात उपस्थित कणकवलीचे तहसीलदार पवार ,सूभेदार मेजर,राॅय व प्रा. महाडिक