वैभववाडी तालुक्यातील कीटकनाशक विक्री केंद्राचा परवाना निलंबित”
सिंधुदुर्गनगरी
कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांनी वैभववाडी तालुक्यातील नारकरवाडी येथील प्रोप्रा. लक्ष्मन सोपान मुंढे यांच्या मालकीच्या मे. कोकण कृषी विकास केंद्राची नियमित तपासणी दि. 4 डिसेंबर 2024 रोजी केली होती. या तपासणीत, कीटकनाशके अधिनियम 1968 चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १० (४,७), १५ चे उल्लंघन झाल्याचे त्यांचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी परवानाधारक यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव परवाना प्राधिकारी यांना सादर केला होता.त्यानुसार कोकण कृषी विकास केंद्राचा परवाना 25 जून 2025 पर्यंत निलंबित करण्यात अला आहे.
या प्रकरणी, परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यासमोर 26 मे 2025 रोजी सुनावणी आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीदरम्यान, मे. कोकण कृषी विकास केंद्राचे प्रोप्रा. लक्ष्मन सोपान मुंढे यांनी कीटकनाशके अधिनियम १९६८ चे कलम १३, १४ व कीटकनाशके नियम १९७१ चे नियम १०(४,७), १५ मधील कायदेशीर तरतुदींचा भंग झाल्याची बाब मान्य करून यापुढे सर्व कायदेशीर तरतुदींचा पालन करण्याचे कबूल केले आणि कारवाई न करण्याबाबत विनंती केली.
परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी परवानाधारकाचे म्हणणे ऐकूण घेतले. परंतु कीटकनाशके अधिनियम १९६८ व कीटकनाशके नियम १९७१ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्यामुळे मे. कोकण कृषी विकास केंद्र या कीटकनाशके विक्री केंद्राचा कीटकनाशके विक्री परवाना (परवाना क्रमांक LCID0120232939SIN) ते २५ जून २०२५ पर्यंत निलंबित करण्याचा आदेश दिलेला आहे.
तसेच निलंबित कालावधीत परवानाधारकाने कोणत्याही प्रकारचा किटकनाशके खरेदी विक्रीचा व्यवहार न करण्याबाबातदेखील बजावलेले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी सर्व विक्रेत्यांना कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करणेबाबत आवाहन केले आहे.
