You are currently viewing कुडाळात एमआयडीसीच्या गटारातच सेप्टिक टॅंक…

कुडाळात एमआयडीसीच्या गटारातच सेप्टिक टॅंक…

कुडाळात एमआयडीसीच्या गटारातच सेप्टिक टॅंक…

कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ;नगरसेविका संध्या तेरसे

कुडाळ
शहरात एमआयडीसीकडून बांधण्यात येत असलेल्या चौपदरी रस्त्याच्या गटारात नवीन सेप्टिक टैंक बसविल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नगरसेविका संध्या तेरसे यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष वेधले असून, ज्या व्यक्तीने ही सेप्टिक टैंक बसवली आहे, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

कुडाळमध्ये एमआयडीसीच्या रस्त्यालगत गटाराचे बांधकाम सुरू असून एक प्रशस्त रस्ता गटारासहित बांधला जात आहे. एस. एन. देसाई चौक ते महामार्ग या रस्त्यावर, प्रथमेश कॉम्प्लेक्सजवळ बांधण्यात येत असलेल्या गटारात थेट सेप्टिक टैंक टाकण्यात आला आहे. या प्रकाराची संबंधित यंत्रणा किंवा काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला कोणतीही माहिती नसल्याचे समोर आले आहे. सौ. तेरसे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, ती सेप्टिक टैंक काढून टाकायला सांगितल्याची माहिती त्यांना देण्यात आली. कुडाळ शहरातील मुख्य रस्त्यावर एमआयडीसीच्या जागेत राजरोसपणे गटारात अतिक्रमण करताना कोणत्याही कारवाईची तमा न बाळगता हे घडले आहे, ही नक्कीच खेदाची बाब असल्याचे सौ. तेरसे यांनी म्हटले आहे.

आता ही बाब लक्षात आल्यानंतर ती टाकी संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून काढून घेण्यात येणार असली तरी ज्या कोणी ही टाकी बसवली त्याच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही का? असा सवाल सौ. संध्या तेरसे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत कायदेशीर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सौ. तेरसे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे. या घटनेमुळे शहरात अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा