वृत्तसंस्था:
जॉर्जिया, 29 जानेवारी : गेल्या वर्षभराहून अधिक काळ जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूचा (Corona Virus) कहर आता थोडा कमी झाल्यासारखं वाटतं आहे. काही लशीही आल्यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही धोका अद्याप कमी झालेला नाही असा इशारा शास्त्रज्ञ, डॉक्टर्स आणि यंत्रणेतील सर्व जण वेळोवेळी देत आहेत. त्याबद्दलचं संशोधनही जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सुरू आहे. त्यामुळे नवनवी माहिती हाती येत आहे. अशाच एका संशोधनानुसार कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या मेंदूमध्ये (Brain) कोरोना लपून बसतो, असं दिसून आलं आहे.
काही व्यक्ती कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही दिवसांनी बऱ्या होतात.
मात्र त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा अचानक मृत्यू होतो किंवा त्या गंभीर आजारी पडतात, अशी काही उदाहरणं दिसून आली आहेत. अशा घटनांमागे कोरोना विषाणू मेंदूत राहिलेला असल्याचं एक कारण असू शकतं, असं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. अमेरिकेतील जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतील (Georgia State University) शास्त्रज्ञांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार कोरोना विषाणू मानवी मेंदूत वास्तव्य करू शकतो. ‘आज तक’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
जॉर्जिया स्टेट युनिव्हर्सिटीतल्या शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एका उंदरावर या गोष्टीचं निरीक्षण नोंदवलं. या उंदराला अनेक शारीरिक आणि मानसिक व्याधी जडल्या. त्या उंदराला कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर पाच ते सहा दिवसांतच विषाणू उंदराच्या मेंदूत जाऊन लपला. त्याच्या फुप्फुसांमधल्या कोरोना विषाणूंची संख्या मात्र तिसऱ्या दिवशीपासूनच घटू लागली होती. याचाच अर्थ असा, की कोरोना आता फुप्फुसांच्या ऐवजी शरीराच्या सर्वांत महत्त्वाच्या अवयवांकडे आपला मोहरा वळवतो आहे. मेंदूत असलेल्या कोरोना विषाणूंची संख्या शरीरात अन्यत्र असलेल्या विषाणूंच्या तुलनेत एक हजार पटींनी अधिक होती, ही चिंताजनक बाब असल्याचंही शास्त्रज्ञ म्हणाले.