एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत विविध घटकांचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन 2025-26 अंतर्गत संरक्षित शेती घटकांतर्गत हरीतगृह, शेडनेट हाऊस व प्लास्टिक मल्चिंग या घटकांरिता लाभ दिला जात आहे.तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या घटकांचा लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर https://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज सादर करण्याचे, आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर पिकास पोषक वातावरण निर्मिती करुन उच्च दर्जाचा भाजीपाला व फुलपिके घेण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. हरितगृह व शेडनेटगृहाच्या वापरामुळे फुले व भाजीपाला पिकांचे निर्यात येाग्य गुणवत्तेच्या मालाचे उत्पादन होत. शेतकऱ्यांना कमी क्षेत्रामध्ये खुल्या वातावरणाच्या तुलनेत 3 ते 4 पटीने उत्पादन घेता येते. त्यामुळे हरितगृह व शेडनेटगृह उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत असून संरक्षित शेतीस मोठ्य प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
लाभाच्या योजना:- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषि विकास योजना
आवश्यक कागदपत्रे :- ॲग्रीस्टॅक फार्मर आय डी, 7/12 उतारा, 8–अ, आधार कार्डाची छायांकीत प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी), विहीत नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र, चतु:सीमा नकाशा. अनुसुचित क्षेत्रासाठी 15 टक्के अतिरिक्त खर्चाचा मापदंड देय आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी :- शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/Agrilogin/Agrilogin या संकेतस्थळावर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत. योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी किंवा http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळ संपर्क साधावा.
Ø खर्चाचा मापदंड, अनुदान मर्यादा व क्षेत्र मर्यादा
| अ.क्र. | बाब | प्रती चौ.मी. खर्चाचा मापदंड | अपेक्षित खर्च | 50% देय अनुदान | क्षेत्र मर्यादा |
| 1 | हरितगृह (OVPH) | रु.1000 ते 1200 | 5 गुंठे – 6.0 लाख 10 गुंठे – 10.58 लाख 20गुंठे – 20.80 लाख 25 गुंठे – 25.00 लाख | 5 गुंठे- 3.0 लाख 10 गुंठे- 5.38 लाख 20 गुंठे- 10.40 लाख 25 गुंठे- 12.50 लाख | 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी. |
| हरितगृह (CCPH) | रु.1500 ते 1800 | 5 गुंठे – 9.0 लाख 10 गुंठे – 16.12 लाख 20गुंठे – 31.20 लाख 25 गुंठे -37.50 लाख | 5 गुंठे- 4.50 लाख 10 गुंठे- 8.06 लाख 20गुंठे- 15.60 लाख 25 गुंठे- 18.75 लाख | 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी. | |
| 2 | शेडनेटगृह | रु.710 | 5 गुंठे- 3.55 लाख 10 गुंठे- 7.18 लाख 20गुंठे-14.76 लाख 25 गुंठे-17.75 लाख | 5 गुंठे- 1.77 लाख 10 गुंठे- 3.59 लाख 20गुंठे-7.38 लाख 25 गुंठे-8.87 लाख | 500 चौ.मी. ते 2500 चौ.मी. |
| 3 | प्लास्टिक मल्चिंग | रु.4.0 | ४०००० प्रति हे. | २०००० प्रति हे. | जास्तीत जास्त 2 हे. |
| नव्याने समाविष्ट घटक | |||||
| 4 | फळ पिकांकरिता फळांना/ फळांच्या घडांना कव्हर (Fruit Cover & Crop Cover) | रु.5.0 | रु . 50000/हे | रु . 25000/हे | जास्तीत जास्त 2 हे. |
| 5 | तण नियंत्रक अच्छादन (Weed Mat) | रु . 50.00 | रु . 200000 / एकर | रु . 100000 / एकर | जास्तीत जास्त ४००० चौ.मी. |
| 6 | हायड्रोपोनिक्स आणि एरोपोनिक्स | रु.350 | रु.३५०००० / १० गुंठे | रु.१७५००० / १० गुंठे | जास्तीत जास्त 1000 चौ.मी. |

