ऑन कॉल रक्तदात्यांमुळे वाचले दोन रुग्णांचे प्राण
सावंतवाडी :
अलिकडील वादळी वाऱ्याच्या परिस्थितीतही ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ च्या सदस्यांनी पुन्हा एकदा देवदूताची भूमिका बजावत दोन गरजू रुग्णांना जीवनदान दिले आहे. दोन वेगवेगळ्या रुग्णांना रक्ताची तातडीची गरज असताना संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत रक्तदान केले.
*शीतल कुर्डीकर यांच्यासाठी धावला अभिषेक नाईक*
मंगळवारी शीतल प्रकाश कुर्डीकर यांना बायपास सर्जरीसाठी ए पॉझिटिव्ह रक्ताची तातडीने गरज होती. ‘ऑन कॉल रक्तदाते संस्थे’चे सचिव बाबली गवंडे यांनी संस्थेच्या समूहावर यासंबंधीची पोस्ट टाकताच, तळवडे येथील संस्थेचे ऑन कॉल रक्तदाते अभिषेक नाईक यांनी तत्काळ संपर्क साधला. सकाळी वादळ, वारा आणि पावसाची पर्वा न करता अभिषेक नाईक यांनी स्वतःच्या मोटरसायकलने GMC बांबोळी येथील रक्तपेढीत जाऊन आपले सहावे रक्तदान केले. यावेळी ऑन कॉल रक्तदाते संस्थेचे मातोंडमधील ऑन कॉल रक्तदाते देवेश परब हे देखील मदतीसाठी तत्पर होते, परंतु रक्ताची गरज पूर्ण झाल्याने त्यांना राखीव ठेवण्यात आले.
*राजश्री मेस्त्री यांच्यासाठी सुशील मेस्त्री यांची धावपळ*
याच दिवशी, सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले येथील रहिवासी आणि सध्या म्हापण, वेंगुर्ला येथे वास्तव्यास असलेल्या राजश्री मेस्त्री यांना एबी पॉझिटिव्ह रक्ताच्या किमान चार बॅग्जची GMC बांबोळी येथे आवश्यकता होती. ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’चे कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी संस्थेचे नियमित बी पॉझिटिव्ह रक्तदाते सुशील मेस्त्री (सांगेली) यांच्याशी संपर्क साधला. सुशील मेस्त्री यांनीही तात्काळ प्रतिसाद देत GMC बांबोळी रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. हे त्यांचे नववे रक्तदान होते. विशेष म्हणजे, सुशील मेस्त्री हे संस्थेचा लोगो आणि नाव असलेला टी-शर्ट घालूनच रक्तदान करण्यासाठी गेले होते, ज्यामुळे GMC रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’चे रक्तदाते म्हणून तत्काळ ओळखले आणि त्यांना योग्य सेवा दिली.
याशिवाय, सार्थक फाऊंडेशनचे संयोजक सुदेश नार्वेकर यांच्या माध्यमातून सकाळीच तीन रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
या सर्व रक्तदात्यांमुळे आणि दोन्ही संस्थांच्या समन्वयामुळे दोन रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध झाले आणि त्यांचे प्राण वाचले. शीतल कुर्डीकर आणि राजश्री मेस्त्री यांच्या नातेवाईकांनी अभिषेक नाईक, सुशील मेस्त्री, देवेश परब यांच्यासह इतर तीन रक्तदाते, तसेच महेश रेमुळकर आणि सुदेश नार्वेकर तसेच दोन्ही संस्थांचे आभार मानले आहेत.
‘ऑन कॉल रक्तदाते संस्था, सिंधुदुर्ग’ आणि सार्थक फाऊंडेशनने दाखवलेला हा पुढाकार आणि आपत्कालीन परिस्थितीत केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे.

