You are currently viewing आयुष्याची काही पाने…

आयुष्याची काही पाने…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*आयुष्याची काही पाने…*

 

एक दिवस आयुष्याची वही घेतली चाळायला

तर डोळेच लागले गळायला..

वाटले किती पापड लाटले हो आयुष्यात?

संकटे? आली ना.. भरपूर, जीवघेणी, आर्थिक

मानसिक, कौटुंबिक, सर्वच आली हो..

 

पण तारूण्य व जिद्द नावाची गोष्टच अशी आहे

की त्याची नशाच असते डोळ्यांवर.. त्यामुळे त्रास

झाला पण ऱ्हास कधीच नाही झाला, घसरलो नाही, तरलो कारण इच्छाशक्ती दुर्दम्य होती. तेव्हा हे ही कुठे कळत होते? आता मी तावूनसुलाखून निघाल्यावर त्याचे विश्लेषण

करते आहे, जेव्हा पुलाखालून खूप पाणी वाहून

गेले आहे.

 

अवघी २२ वर्षांची मी अडीच वर्षाच्या लेकराला

कुलूप लावून शेजारी किल्ली देऊन काळजावर

दगड ठेवून बी एड साठी रोज घर ते कॅालेज १२

किलोमिटर पायपीट करत होते.कारण ही पायपीट केली नाही तर? अहो, दोन चाकांनी

कधी गाडी नीट चालते का? लेकरू ही किती

शहाणं! आठवलं की डोळ्यात पाणी येतं.” आई,

तू जा नं, मी नाही ललत.” उठला की,शेजारी

हाक मारून,” काकू, मी उठलो, मला घ्या म्हणणारं..” मोलकरणीच्या कडेवरून शाळेत

जाणारा व येणारा. वाटते, तेव्हा हे केले नसते तर? आज ह्या मुक्कामाला आलो असतो का

आपण? हातपाय हलवल्याशिवाय नाही पोहता

येत हो? नाहीतर मग बुडूनच मरायचे! नव्हते मला. सारेच पायाने हो.. उठलो की चालू लागायचे. अगदी पहाटे डोक्यावर पेट्या घेऊन

गावाकडे जाणाऱ्या एस टी ला गाठायला सुद्धा!

 

बी.एड ला असतांना…

गणेशवाडी पंचवटीतून राममंदिरावरून एकमुखी

दत्ताच्या पायऱ्या अर्ध्या अधिक चढून गेल्यावर,

पहाटे साडेसहाच्या त्या शुकशुकाटात एक साधू

अचानक सामोरा आला नि माझ्या हातातल्या

घड्याळाकडे पहात म्हणाला,” What is Time” क्षणभर गांगरले नि ताडताड पायऱ्या

चढत वर गांवकरी कार्यालयाजवळ निघाले.

बाप रे! आत्ताही भीती वाटते आठवले की?

देवानेच मला बुद्धी दिली त्याच्याशी काही न

बोलण्याची? कुणाचे हेतू काय माहित आपल्याला?…..असो.. निभावले, नंतर मी विसरूनही गेले.

 

विश्वास नाही बसणार तुमचा? पण भविष्यात

या कष्टांना इतकी रसरशीत फळे लागणार आहेत हे माहित असते तर किती सुखावलो असतो. पण नाही, सारेच ब्लॅंक होते. भविष्याच्या

या अंधारकोठडीत काय लपले होते याची

सुतराम कल्पना नव्हती. पण लढणे मात्र माहित

होते. ते का? हे ही माहित नव्हते. अशी कोणती

प्रेरणा होती जी पुढे जा म्हणत होती माहित नाही.

यालाच प्रारब्ध म्हणतात का?

 

लढा इथेच संपला नव्हता. एम ए व्हायचे होते. बी. ए. ही घरी अभ्यास करूनच केले. एम ए पार्ट १…

पार्ट टाईम नोकरी प्लस घर प्लस अभ्यास. पार्ट

२ ला प्रेग्नंसीत घरीच अभ्यास. आठव्या महिन्यात

परीक्षा. भर मे महिन्यात रस्ता तुडवत कॅालेजच्या

लायब्ररीत जाऊन बसणे. आता दारात ३/३ गाड्या असतांना गाडीत

बसतांना वाटते कसे चाललो आपण त्या वेळी

इतके? विश्वासच बसत नाही हो! सारे चित्र

आजही लख्ख डोळ्यांसमोर दिसते. रिक्षा ही नव्हत्याच. आणि असत्या तर “नाना” कुणाकडे

होता? सगळाच नन्ना होता हो! तरी तरलो. हरलो

नाही. मोठी गंमतच आहे.

 

हा सारा चित्रपटच विस्मयकारक आहे हो! एक

गोष्ट नक्की. जिद्दीला त्या “वरच्याचे” पाठबळ

असतेच. रस्ता मात्र नेक हवा. तो होता. संस्कारंच

तसे होते.अहो, त्या वेळी ते देशासाठी लढले. आम्ही तर फक्त आमच्या साठी लढलो. त्यात

काय विशेष? तुमच्या साठी दुसरा कोण कशाला

लढेल? आपणच लढले पाहिजे ना? तेच केले.

काही नवल नाही केले.पण मागे वळून पाहता

जिद्दीचे कौतुक वाटते हो. सांगू नये अशा गोष्टी

पण खूप असतात ना? सांगून काय फायदा होतो? काहीच नाही हो. चव्हट्यावर हिशोब

मांडून फक्त बघ्यांची करमणूक होते. आपला

फायदा शून्य. झालाच तर मनस्ताप वाढणार.

बाकी काही नाही. म्हणून मूठ बंद ठेवण्यातंच

मजा आहे लक्षात ठेवा. लोकांनी आपल्याला

चघळण्यात काय मजा आहे? घटकाभर करमणूक त्यांची नि ते काय मदत करतात?

अजिबात नाही. चार ठिंकाणी हसत हसत चर्चा

मात्र नक्कीच करतात. छद्मी हसतात. विकृत

आनंद घेतात.

 

मला वाटते कुणाचाच प्रवास इतका साधा सोपा

कधीच नसतो. काही अपवाद असतातही. नक्कीच. स्वत:चा लढा संपल्यावर नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर मुलांसाठी झगडणे सुरू

झाले. नोकरी घर व मुलांचा अभ्यास. आता वाटते, खूप सजग पालक होतो का आम्ही? मुले

चार पाच वर्षांची असतांनाच वाचू लागली होती.

घरी गोष्टींची पुस्तके असतंच. त्यामुळे व कठोर

परिश्रमामुळे वर्गात ते सतत पहिले दुसरे राहिले.

१२ वीला दोघांना ९६/९६ टक्के(त्या वेळी) मार्क्स

पडले. दोघे गव्हर्मेंट मेडिकल कॅालेज मुंबई/ पुणे

येथे शिकले.

 

धाकटा बी जे मध्ये थर्ड ईअरला असतांना त्याच्या

एका फोन मुळे मार्च ते जून तीन महिने रजा

टाकून मी पुण्याला घर न मिळाल्यामुळे थेट

तळेगांवचा रस्ता धरला. रोज लोकलचा दोन

तासांचा (येताजाता) प्रवास करून घरचे जेवण

त्याला पोहोचवणे. रूम भाड्याने घेतली. दोन रूम होत्या एका बंगल्यातल्या. पाणी टंचाई प्रचंड.

माझा पिशव्यांमधला संसार. साग्रसंगीत स्वयंपाक करून स्टेशनवर जाऊन तळेगांव

लोकल पकडायची. रिक्षाने कॅालेजचे होस्टेल

गाठायचे. समोर चहाची टपरी होती. त्याला विनंती करून डबा सोपवायचा व मुलाने आणून

ठेवलेला रिकामा डबा घेऊन दीड वाजे पर्यंत

तळेगांव गाठायचे. अभ्यासाचे प्रेशर एवढे होते की

१८ ते २० तास) तो रोज मला भेटू शकत नसे. डब्यात चिठ्ठीतून

आम्ही बोलत असू. फोनचे प्रस्थ च नव्हते. मग

१० मिनिटे भेटत असू. प्रचंड मानसिक ताणाचे

दिवस होते ते. २१ मे लाही तळेगांवच्या हवेत मला थंडी वाजत असे. माझ्याकडे मी एकच

शाल पांघरायला नेली होती.माझा मोठा मुलगा

जे जे ला एम डी करत असतांना तो ही अधून

मधून यायचा. मिस्टरही सुट्या लागल्यावर आले.

एक गोणी फक्त सामान नेले होते त्याच्या

तळेगांवहून निघतांना १३ गोण्या झाल्या. चाकण

फाट्यावरून आम्ही उघड्या टेंपोतून तळेगांव

प्रवास करत असू.१६ जूनला प्रॅक्टिकल्स व

परीक्षा आटोपल्या व मुलगा तळेगांवला आला.

आम्ही मोठ्या दिव्यातून पार पडलो.बराच बारीक

तपशील मी लिहिला नाही, ते शक्य नाही.

 

१७/१८ जून १९९७ ला आम्ही नाशिकला आलो.

रिझल्ट लागला नि विशाल गोल्डमेडल घेऊन

पहिला आला. || व ||| MBBS दोन्ही वर्षे गोल्ड

मेडल. बघा कष्टांना किती रसरशीत फळे येतात

हो! अजून संघर्ष संपलेला नव्हताच. पुन्हा दोन

वर्षांनी DNB ॲाल इंडिया लेव्हलची अत्यंत कठीण परीक्षा जिचा रिझल्ट दोन ते पाच टक्के फक्त असतो. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास!

हाडाची काडे नि रक्ताचे पाणी इथे कळते.

परीक्षा भारतात कुठे ही होते. तेव्हा बनारसला

(२००२) होती. थेअरी मुंबईला होती. दोघे गेलो.

मुलाच्या मित्राच्या फ्लॅटमध्ये थांबलो.३/४ दिवस

मुक्काम होता. नंतर मग चलो बनारस. ॥ ए सी चं

रिझर्वेशन केलं. विशालचा मित्र अनुप व मी. डब्यात फक्त तिघेच आणि टी सी. यमुना पार होतांना मी डोळ्यांनी पाहिली.

 

मोठमोठ्या पोलिसी बॅगा पुस्तके भरून घेऊन निघालो होतो.

हमालही हरले, म्हणाले,”माताजी इसमे क्या है”?

म्हणाले, देख सकते हो भैया” हसायला लागला.

बनारस आले. उतरलो. टॅक्सी घेतली. बनारस

हिंदू विश्वविद्यापीठाच्या जवळच हॅाटेल बुक केलेले होते. अभ्यासाची खोटी होऊ नये म्हणून

रोजी ६००/- भाड्याच्या दोन रूम घेतल्या होत्या.

घरून तेल मीठ पीठ घेऊन गेले होते. किचन मधील स्वयंपाक्याकडून मला पाहिजे, मुलाला

चालेल असे जेवण बनवून घेत होते. हो, तिथे

सरसो तेल. आपण खात नाही. ५ दिवस मुक्काम

होता. टेंन्शनमुळे खोकला विशालची पाठ सोडत

नव्हता. कसं होणार? प्रॅाब्लेमच प्रॅाब्लेम…

शेवटी स्टेरॅाईडची गोळी खाऊन परीक्षेला गेला.

माझे काय होत असेल सांगा?

 

दिवसभर परीक्षा चालली. आठ ते आठ. कुणी

पाणीही विचारले नाही. पिळून पिळून घेतात हो!

रात्री आठला विशाल बाहेर आला. प्रॅक्टिकल परीक्षा उत्तम झाली होती.खूप उलटसुलट प्रश्न

विचारले पण विशालची तयारीच तशी होती.

सुटलो एकदाचे, परीक्षांच्या ससेमिऱ्यातून.थोडे

बनारस फिरलो. साड्या घेतल्या. परतीचे रिझर्वेशन होतेच. बसलो गाडीत तिघे. आलो.

आता रिझल्टकडे डोळे लागले होते.

दररोज नियमितपणे मी जवळजवळ १५ वर्षे

जिमला जात होते. दुपारी दीड ते साडेतीन. त्यावेळी ओझर शाखेत माझी बदली झाली होती.

अशीच मी जिममध्ये असतांना विशाल धाडधाड

जिन्यावरून पळत जिममध्ये आला नि मला बिलगला. आई मी DNB पास झालो. मी घरी

जाईपर्यंत त्याला धीर निघाला नाही. मी तिथल्या

तिथे जिममध्ये पेढे मागवून सर्वांना दिले. आम्ही

घरी आलो.

 

किती सुखावलो होतो, शब्दात नाहीच मावणार.

मोठी कठीण लढाई जिंकली होती. बी जे ला प्रवेश घेतल्यापासून कष्टांना सीमा नव्हती. मध्ये

इंटर्नशीपला बरेच कठीण प्रसंग येऊन गेले होते.

कोकणात सफाळे जवळ आदिवासी भागात काम मिळाले होते. जाऊ दे, गेले ते दिवस.

आणि DNB थेअरी प्रॅक्टिकल एकाचवेळी

विशाल सुटला होता. अवघड अवघड…

आता प्रॅक्टीस सुरू करणे. इंन्हेस्मेंट आलीच.

ती ही आम्ही केली. जागा घेतली नि २००२

ला क्लिनिक सुरू झाले. खूप हार्ड वर्क आणि

सिन्सिअरली काम. आज रेडिॲालॅाजितील विश्वसनिय नाव डॅा. विशाल पवार. हीच ती

कमाई, इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली.

 

आणि लोकांना डॅा. ची ही तपश्चर्या माहितच नसते. त्यांना वाटते आला लुटायला. आमच्या सारखे संस्कारी लोक उपयोगी पडण्यासाठीच

जन्माला आलेले असतात हे लोकांना कळतंच

नाही. इतर खाती लुटतात, आपणही लुटारूच

असतो, फुकटची एक संधी आपण सोडत नाही

हे सारे सोयिस्करपणे ते विसरतात व सब घोडे

बाराटक्के हा न्याय सर्रास लावतात.आपल्या

डोळ्यातील मुसळ कधी दिसणारच नाही का आपल्याला?

दुसऱ्याचे कुसळ शोधण्यातच आपला जन्म जाणार का? लोकसंख्या वाढते त्यात आपण

कधीच नसतो तसा हा प्रकार आहे. दोषी आपण

कधीच नसतो का? खूप गोष्टी असतात हो, पण

बोलून उपयोगच नसतो हो. त्याचा काही फायदा

नसतो. कारण आपण प्रत्येकच वाईज असतो ना? अनेक अर्थांनी. चालायचेच.खूप पाने आहेत

आयुष्याच्या लढाईची. सर्वांचीच असतात, थोड्याफार फरकाने सारखीच. लढल्याशिवाय

जय मिळतंच नाही हे. हातपाय न हलवता नाव

किनारी कशी लागणार? जीवापाड मेहनत करून

किनारा गाठावाच लागतो. नाही तर नाव भोवऱ्यात सापडलीच म्हणून समजा. काहींना नशिबाने किनारा सापडतो काही भोवऱ्यातच गरगरत राहतात त्याला प्राक्तन म्हणावे काय?

माहित नाही. हा आयुष्याचा प्रवास सोपा नक्कीच नाही हे मात्र खरे आहे. एक मात्र आणखी सत्य आहे की ही पाने आपणच लिहायची असतात, नाही तर ती कोरीच राहून

वाऱ्यावर फडफडत राहतात व लोक “आ”वासून

आपल्याकडे बघत राहतात.शेवटी वेडे ठरतो

आपणच.बरंय् मंडळी. बाकीची पाने नंतर उघडू

या.

 

ही माझी मते आहेत फक्त.

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा