*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*अमरत्व शाप की वरदान?*
अश्वत्थामा बलिर्व्यासो
हनुमांश्च बिभीषण:
कृप: परशुरामश्च
सप्तएतै चिरंजीवित:
हिंदू पुराणानुसार अश्वत्थामा, बली, व्यास हनुमान, बिभीषण, कृपाचार्य आणि परशुराम हे सात चिरंजीव आहेत. म्हणजे त्यांना मरण नाही, ते अमर आहेत. आजही त्यांचा पृथ्वीतलावर वावर आहे अशी समजूत आहे. यात आठवे चिरंजीव मार्कंडेय ऋषीचाही समावेश आहे.
एका अश्वत्थामा व्यतिरिक्त बाकीचे हे चिरंजीव कुणाना कुणाकडून मिळालेल्या वरदानामुळे अमर आहेत. अश्वत्थाम्याचे अमरत्व मात्र शापित आहे.
अर्जुन आणि अश्वत्थामामध्ये ब्रह्मास्त्र वापरून लढाई सुरू असताना कृष्णाने भविष्यातला भीषण संहार जाणून दोघांनाही ब्रह्मास्त्रं माघारी घेण्याचा आदेश दिला. अश्वत्थाम्यास हे अस्त्र परत घेण्याचे ज्ञान अवगत नव्हते म्हणून त्याने अभिमन्यूची गर्भवती पत्नी उत्तरा हिच्या गर्भात ते अस्त्र सोडले आणि या गंभीर प्रमादामुळे त्याला कृष्णा कडून अमरत्वाचा शाप मिळाला. त्याच्या कपाळावरचा संरक्षक मणी त्यास काढून द्यावा लागला आणि असा पीडित अश्वत्थामा युगानुयुगे कपाळावरची भळभळती जखम सोसत दारोदारी तेल मागत फिरत आहे अशी कथा आहे. अशा शापित अमरत्वामुळे हजारो वर्ष जखम सांभाळणाऱ्या अश्वत्थाम्याची ही कहाणी फार करुण आहे.
अर्थात या साऱ्या पुराणातल्या कथा आहेत आणि या कथांना कुठलेही तार्किक निकष नाहीत. या कथा म्हणजे फॅन्टसी आहे म्हणून त्याही अमरच आहेत असं मानायला हरकत नाही. अशा अमरत्वाच्या कथा जपानी, ग्रीक, आयरिश पुराणातही वाचायला मिळतात पण जेव्हा मी या पुराणोक्त कथांचा तार्किकतेने विचार करते तेव्हा वाटतं खरोखरच असं हे अमरत्व प्राप्त होणारी व्यक्ती भाग्यशाली ठरू शकते का? क्षणभर माझ्या मनात असाही विचार येतो की असे अमरत्व जर मला मिळाले तर हे वरदान मिळणारी मी भाग्यशाली असू शकेन का?
अमरत्वामुळे बदलत्या जगाचा अनुभव घेता येईल. बदलती संस्कृती, जगण्याची, नीतीची बदलती परिमाणे अनुभवताना कदाचित ज्ञानाची समृद्धी होऊ शकेल. मृत्युचं भयच नसल्यामुळे साऱ्या विश्वात मुक्त संचार करता येईल. जगण्याचा भरपूर अनुभव गाठीशी असल्यामुळे सद्य समाजात चांगले कार्य करण्याची आणि जगाला संकटविमुक्त करण्याची संधीही मिळू शकेल. स्वतःच्या अमरत्वाचा असा विचार करत असतानाच मला अकबर बिरबलची एक कथा आठवली.
एकदा एका महापंडीत ज्योतिषाला बादशहा अकबर दरबारात पाचारण करतो आणि त्याच्याकडून स्वतःचं भविष्य जाणून घेण्याची इच्छा प्रकट करतो. ज्योतिषी त्याच्या हस्तरेषा निरखतो. कागदावर काही आराखडे मांडतो. बोटावर कसली तरी मोजणी करतो आणि उत्तरतो,” जहापनाँह! आपण फार दुर्दैवी आहात. आपल्या जीवनात प्रियजनांचे मृत्यू पाहण्याचे दुर्भाग्य मला स्पष्ट दिसत आहे.”
बादशाह अकबर प्रचंड भडकतो आणि त्या ज्योतिष सांगणाऱ्याला जन्मभर कारावासाची शिक्षा फर्मावतो.
बिच्चारा ज्योतिषी!
पण बिरबल त्याच्या मदतीस धावतो राजा अकबराची मनधरणी करून त्या ज्योतिषास एक संधी देण्याची विनंती करतो. पुन्हा दरबारात तोच ज्योतिषी दाखल होतो. पुन्हा त्याच हस्तरेषा, तेच आराखडे पण शब्द फक्त वेगळे. “जहापनाँह तुम्ही खूपच भाग्यवान आहात तुम्हाला दीर्घायुष्य संभवते. लांबलचक आयुष्य तुम्हाला लाभलेले आहे.” अकबर खुश. ज्योतिषाचा कारावास संपतोच शिवाय सुवर्ण मोहरांची थैली ही त्यास बादशहाकडून प्राप्त होते. या कथेचे तात्पर्य हेच की “दीर्घायुष्य म्हणजे दुःखच, आप्तजनांचा, प्रियजनांचा वियोग आणि अखेर न संपणारा एकाकीपणा” दीर्घायुष्य ही जर अमरत्वाची पहिली पायरी समजली तर मग अमरत्व हे वरदान कसे असू शकते? अमरत्व म्हणजे दुःख आणि निराशाच, निष्क्रियता, उदासीनता, मृत्युचे भय नसल्यामुळे प्रेम, मैत्री या सुंदर,भावनांचाही विनाश होण्याची शक्यता. प्रेम नाही, मैत्री नाही, आपुलकी नाही, जवळीक नाही आणि गुंतवणूकही नाही. अमरत्वाच्या अहंकारात जळून गेलेल्या या सुंदर भावनांची फक्त मूठभर राखच हाती उरेल मग कसले भाग्य? उरेल फक्त एक भळभळती, वाहती जखम. नको हे अमरत्व.
मला आठवतं, माझी आजी शंभरीत होती. पार थकली होती.एकदा माहेराहून परतताना ती मला पटकन् म्हणाली,”सांग ना कधी मी मरेन?” तिच्या निस्तेज डोळ्यातला तो केविलवाणा भाव आजही माझ्या अंतरात डचमळतो.
जीवन हे क्षणभंगुर आहे. देह हा नश्वर आहे आणि आत्मा अमर आहे. सामान्य, प्रापंचिक व्यक्तीसाठी हेच तत्त्व उचित आहे. कधीतरी आपणास हे जग सोडून जायचे आहे ही भावना म्हणजेच क्रियाशीलता. जगण्यातलं आव्हान टिकवणारी आहे. या भावनेतच सृजनाची निर्मिती आहे म्हणूनच अमरत्व हे वरदान ठरू शकत नाही.
आपल्या संस्कृतीत म्हटले आहे ,”मरावे परी कीर्तीरूपे उरावे!”
देहाचं अमरत्व नको. अनेक रथी महारथी गेले, संतांनी आपलं लोककार्य निभावलं आणि ते समाधीस्थ झाले. राम गेले, कृष्ण गेले पण त्यांची वचने त्यांचे सद्भाव, सत्कृत्ये, सद्गुण मागे उरले.त्याद्वारे ते अमर झाले.
ब्रह्मा विष्णु महेश म्हणजेच उत्पत्ती,स्थिती आणि लय. सकाळी उमललेलं फूल संध्याकाळी कोमेजतं.
॥जो जो प्राणी आला माउलीच्या पोटी
धरित्रीच्या पोटी तो तो जाई॥
हा वैश्विक नियम आहे. “अमरत्व” हे विश्वतत्त्वाच्या विरुद्ध आहे.प्रवाहाच्या विरोधातलं “अमरत्व” हे भाग्यदायी असू शकत नाही.
अमरत्वाची व्याख्या आपण बदलू शकतो. सत्कर्मात उरणं म्हणजे अमरत्व.
शब्दांत, सुविचारातलं उरणं म्हणजे अमरत्व. म्हणूनच माझी प्रार्थना आहे, “देवा असे अमरत्व माझ्या वाट्याला येऊ दे. माझी कागदावर लिहिलेली एक तरी ओळ या पृथ्वीतलावर युगानुयुगे वाचली जावी.”
हेच माझं मागणं.
तरीही एक सुप्त भीती मात्र मनात आहे. कृत्रीम बुद्धीमत्ता (AI) ही ज्ञानप्रणाली विकसित होत आहे. न जाणो त्या तंत्राने जर देहाचं अमरत्व गाठलं तर? तेव्हा मात्र बदललेल्या परिस्थितीवर ठरेल “अमरत्व शाप की वरदान.?”
राधिका भांडारकर

