सिंधुदुर्गनगरी येथे अहिल्या भीम पर्व सन्मान व कौतुक सोहळ्याचे आयोजन…
सिंधुदुर्गनगरी
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३००व्या जयंतीनिमित्त आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी समृद्धी पब्लिकेशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने भव्य अहिल्या भीम पर्व सन्मान व कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम रविवार, दिनांक १ जून ला सकाळी ११ वाजता, सिंधुदुर्गनगरी येथील बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भवन येथे संपन्न होणार आहे. या सोहळ्यात कला, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील विविध पैलूंवर आधारित संमेलन आयोजित करण्यात आले असून, यात पुस्तक प्रकाशन, मंगल कार्यक्रम आणि सन्मान सोहळा असे विविध भाग समाविष्ट आहेत.
या कार्यक्रमासाठी पुणे येथील जेष्ठ अभिनेते सुनील गोंडबोले आणि गोव्याचे माजी केंद्रीय मंत्री अँड. रमाकांत खलप हे शुभहस्ते उपस्थित राहणार आहेत. तर दापोली येथील बी.के.जी. डेव्हलपर्सचे संचालक डॉ. दत्तात्रय करपे यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. या सोहळ्याला पुणे येथील उद्योजक ए. एन. खरात, भ.वि.ज. महासंघाचे प्रदेशाध्यक्ष (कोल्हापूर) यशवंतराव शेळके, सुप्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता, लेखक संदीप राक्षे आणि निवृत्त आयपीएस अधिकारी बिरदेव ढोंगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संदीप खोटलेकर (अध्यक्ष, पंचशील ट्रस्ट, ओरोस) आणि महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते दशरथ शिंगारे यांचीही विशेष उपस्थिती लाभणार आहे.
