You are currently viewing वाटसपार युद्ध

वाटसपार युद्ध

*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक भोवतालकार साहित्यिक विनय सौदागर लिखित काकल्याचे तर्कट-१४*

 

*वाटसपार युद्ध*

 

काकल्या घरी आला होता, तेव्हा माझ्या दुर्दैवाने मी मोबाईलमध्ये व्हाट्सअप चेक करीत होतो. आल्या आल्या मला म्हणाला, “काय रे व्हाट्सपार युद्ध खेळतय?” त्याचा खवचटपणा माझ्या लक्षात आल्यामुळे मी फक्त हसलो. पुन्हा म्हणाला, “नाय रे, सेना युद्ध लढताहा, पून तेच्यापेक्षा कैकपटीन जास्त जन्ता व्हाट्सपार युद्ध खेळताहा. सरकाराक सल्ले दिताहा. अरे, जेंची बायलेकडे डोळे वरतेन करून बघूची ताकद नाय, ते सुद्धा घूसान मारूक सांगतहत.”

काकल्याचं बोलणं फारसं चूक नव्हतंच. खरंच, सोशल मीडियावर सल्ले देण्यात, मेसेजेस फॉरवर्ड करण्यातच लोक मश्गूल असतात. देशाचं एक धोरण असतं, अनेक वर्ष ते राबवलेलं असतं, सेनेची एक विशिष्ट तयारी असते. हे सगळं आपण विसरतो. काकल्याचं तर्कट मात्र बर्‍यापैकी बरोबर असतं.

मी थोडंसं समजावत म्हणालो, “अरे, मागील ७१ च्या युद्धाप्रमाणेच पाकला अद्दल घडावी. बलूच, पिओके स्वतंत्र व्हावं ही लोकभावना आहे.”

त्यावर काकल्या तडकला, “अरे पन्नास वर्सात सगळा बदल्ला, तर युद्धनीती बदलाची नाय काय?”

“अरे लोकांमध्ये आस्था असते, म्हणून ते काहीतरी लिहीत असतात, बोलत असतात.” मी म्हणालो.

“हयता माका सांगू नको. जर असा आसा, तर जे बोलणारे आसत तेंच्यापैकी कितक्या जणांचे पोर ते सैन्यात पाठवक तयार आसत ता माका सांग. आणखीन याक, ती राष्ट्रप्रेमाची गजाल तुजेचकडे ठेय. गावात चोर, स्मगलर, लफडेबाज हेंच्या इरोधात सोडा, हेंकाच सोता लोंबकाळतत आणि पाकिस्तानाक धडो शिकवचे गोष्टी करतत.” काकल्या पोटतिडिकीने बोलत होता.

“मग सामान्यानी काय करायचं?” मी बोललो.

“माझा म्हणणा याकच, जा तुमी बोलतास, लिवतास; तेपैकी एक टक्को तरी तुमी करा.” काकल्या फुरफुरत म्हणाला. “व्हावणारा पानी श्यात पिकयणा नाय, जिरणारा पिकयता. तुमच्यात कितक्या राष्ट्रप्रेम जिरला ता तुमी देखवन् दिया. तुयाय झिलाक सरकारी नोकरी सोदतस मां? मगे सैन्यात धाड त्येका. सैन्य सरकारीच मरे. तो अखंड भारत बनवन् येयत. तवसर तुया मोबायला वरसून मिसायल सोड.”

आमच्या चिरंजीवांचा उद्धार करून काकल्या चालू पडला होता.

 

*विनय सौदागर*

आजगाव, सावंतवाडी.

9403088802

प्रतिक्रिया व्यक्त करा