You are currently viewing कपाट

कपाट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठानच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.सौ.मानसी पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कपाट*

 

बंद दारामधून पुसट आवाज आला

किती दिवस झाले उघडले नाही मला

ऐकताच मी त्याचं, कपाट उघडलं

माझं रम्य बालपण क्षणात उभं राहिलं

 

आज जुन्या खिळखिळ्या कपाटात

मला भेटला रविवार जुना

म्हणाला किती दिवसांनी भेटलीस

अशी हरवू नकोस पुन्हा पुन्हा

 

साठवलेले जिन्नस डोळयासमोर आले

काय काय नव्हते त्या भांडारामधे?

जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

त्याचाच जणू मग चित्रपट झाला..

 

सागरगोटे,चिंचोका अन् बांगड्यांच्या काचा

वहीची जीर्ण पाने आणि तुकडा खडूचा

मळकी बाहुली आणि तिचा एकच पाय

गंजलेलं शार्पनर ,अर्धी पेन्सिल ,मोरपीस काय

 

जुन्या गोष्टी बघुन एकदम भरूनच आलं

आठवणींच्या धाग्यात मग मन फिरू लागलं

डोळे भरून काठोकाठ पाणी वाहू लागलं

पुन्हा एकदा रम्य बालपण मुक्त अनुभवलं

 

©️®️डॉ सौ.मानसी पाटील

प्रतिक्रिया व्यक्त करा