*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नक्षत्राची ऐशी तैशी….*
मृगाच्या ही आधी,
नांदी पावसाची !
नक्षत्रांनी केली,
कशी ऐशी तैशी!…१
अवचित आला,
कोसळून गेला !
पाऊस पाऊस,
सर्वत्र भरला !…२
मर्जी त्याची अशी,
कुणा नाही कळे!
पाऊस सरींनी,
भरे रान मळे ! …३
माणूस बोलतो,
निसर्ग फिरला!
माणसाच्या पेक्षा ,
लहरी तो झाला!…४
आता येई आर्द्रा,
फुलेल कातळ!
सोन फुले येता,
रान बहरेल!…५
कृपादृष्टी तुझी,
देवा असू दे रे !
सृष्टीस तुझ्या या ,
सांभाळून घे रे !..६
उज्वला सहस्रबुद्धे

