You are currently viewing मला आवडलेला चित्रपट

मला आवडलेला चित्रपट

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*मला आवडलेला चित्रपट*

 

परवाच अगदी चित्रपटगृहात जाऊन शिवराज वायचळ दिग्दर्शित *आता थांबायचं नाय* हा चित्रपट पाहिला आणि मनावर या चित्रपटाने एक अगम्य असं गारुडच केलं. खूप दिवसांनी एक अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आणि सामाजिक संदेश देणारा चित्रपट पाहायला मिळाल्याचा आनंद झाला.

 

२०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेत घडलेल्या एका घटनेवर आधारित हा चित्रपट आहे. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या समर्पणावर आणि जीवनावर हा चित्रपट प्रकाश टाकतो. *एक मे* या कामगार दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट प्रकाशित झाला आणि लोकांकडून यास उदंड प्रतिसाद मिळत आहे ही समाधानाची गोष्ट.

 

हा चित्रपट पाहताना सहज मनात येते.. एक सुरक्षित, सुविधापूर्ण आणि काहीसं आरामशीर आयुष्य जगत असताना अत्यंत क्लीष्ट, गलिच्छ, उपेक्षित आयुष्य जगणाऱ्या महानगरपालिकेतील कचरा कामगारांच्या, नळ,टाक्या, गटार सफाई करणाऱ्यांच्या जीवनाविषयी आपण कधी आत्मीयतेने विचार करतो का? खरं म्हणजे आज सामाजिक आरोग्य राखणारा, सांभाळणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा वर्ग आहे पण तो अत्यंत असुरक्षितही आहे. चित्रपट माध्यमातून हे जीवनदर्शन बघताना कुठलंही संवेदनशील मन हलल्याशिवाय राहत नाही.

 

या चित्रपटात नगरपालिकेत काम करणाऱ्या स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी उद्भवणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकला आहे. समाजाकडून त्यांची होणारी उपेक्षा ही खरोखरच उद्विग्न करणारी आहे पण एक मानवतावादी, राजकारणांपासून दूर राहणारा प्रशासक आणि एक तत्त्वशील, ज्ञानार्जनाच्या कामात स्वत:ला झोकून देणारा शिक्षक या कामगार वर्गाचा कसा कायापालट करतात याचे सुंदर चित्र या चित्रपटात पाहायला मिळतं.

 

केवळ आयुष्यात संधी न मिळाल्यामुळे, दारिद्र्य, व्यसनाधीनतेमुळे चिखलात रुतलेल्या या कामगारांचा शिक्षणाद्वारे उद्धार करण्याचा वसा कुणीतरी मनापासून घेतल्यामुळे काय चमत्कार घडू शकतो याचे उदाहरण म्हणजे *आता थांबायचं नाय* हा चित्रपट.

 

दहावी पास होण्यासाठी, दिवसभर काम करून रात्रीच्या शाळेत उपस्थित राहण्यापासून ते अभ्यास, परीक्षा देण्यापर्यंतचा एक आशा निराशेचा, शक्याशक्यतेवर सतत लोंबकळणारा हा अत्यंत कठीण प्रवास पाहताना प्रेक्षक क्षणोक्षणी भावनावश होतो.

“खरं आहे”

“ कसं जमेल यांना?

“ज्याची सवयच नाही ते गुण असे वरून यांच्यात कसे पेरणार?” असे नकारात्मक विचार प्रेक्षकांच्याही मनात येत राहतात पण “तेच तर करायचंय आपल्याला, त्यांच्यातला एक अग्नी चेतवायचाय” असे काही प्रेरणादायी संवाद प्रेक्षकांच्या मनातही आशावाद निर्माण करतात आणि हो! जे घडणार नाही असे वाटत असते ते अखेर घडतेच.

*आता थांबायचं नाय*, या निर्धारित जीवनाला एक वेगळं, स्वच्छ अधिक प्रगत ,अधिक उन्नत वळण मिळवण्याची दिशा अखेर त्यांना मिळतेच. ही आहे या चित्रपटाची सुरेख रूपरेषा! शिवराज वायचळच्या दिग्दर्शनाचा एक अत्यंत तगडा अनुभव हा चित्रपट पाहताना मिळतो. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, ओम भुतकर, तुषार गोवारीकर, पर्ण पेठेसारख्या दिग्गज कलाकारांच्या सहजसुंदर अभिनयाने या चित्रपटाला एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली आहे. मुंबईतल्या कामगार वस्तीच्या परिसरात आणि मुंबई महानगरपालिकेत घडणारं हे नाट्य पाहताना प्रेक्षक खचितच जागा होतो. भानावर येतो. नकळत एक अपराधीपणाची भावनाही प्रेक्षक वर्गाला स्पर्शून जाते आणि *आता थांबायचं नाय* या भावना प्रवाहातही तो सहज खेचला जातो.

 

संगीतकार *गुलराज सिंग*चं अप्रतिम संगीत म्हणजे या चित्रपटाची जमेची बाजू. *मनोज यादव* च्या गीत रचना केवळ अप्रतिम! अजय गोगावले आणि आनंदी जोशींनी गायलेली सर्वच गाणी मनावर रेंगाळत राहतात.

 

संगीत, प्रेरणा आणि जिद्दीचा अविष्कार घडविणारा एक सुंदर संदेशवाही, प्रत्येकाने बघावाच असा *मराठी चित्रपट* *आता थांबायचं नाही*.

 

*राधिका भांडारकर पुणे*

प्रतिक्रिया व्यक्त करा