फार्मर आयडी तयार करा, अन्यथा शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही!
सिंधुदुर्गनगरी
केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचविण्यासाठी शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी बनवून घेतले नाही त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आपल्या जवळच्या सीएससी केंद्रावर नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक बनवून शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. तसेच लाभार्थ्यांना वारंवार प्रामाणिकरणाची आवश्यकता (e-KYC) राहणार नाही. ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत आपला सातबारा आधारला लिंक करायचा आहे. जेणेकरून तुम्हाला एक फार्मर आयडी मिळेल. फार्मर आयडी बनवला नाही, तर पिक विमा, पीक कर्ज, पीएम किसान व विविध पीक अनुदान यांचा लाभ मिळणार नाही.
ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकरी माहिती संच तयार करण्यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी डिसेंबर २०२४ पासून नागरी सुविधा केंद्र आणि शिबिरांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या मोहीम अंतर्गत जिल्ह्यात आजअखेर 1 लक्ष 9 हजार 712 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) तयार करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान योजनेचे एकूण 1 लक्ष 80 हजार 491 लाभार्थी आहेत. त्यापैकी आज अखेर 83 हजार 651 लाभार्थ्यांची शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात आले आहेत. अद्याप 96 हजार 840 शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक तयार झालेले नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी तात्काळ शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावे, अन्यथा आपल्याला पी. एम. किसान योजनेचा लाभ मिळणार नाही. सध्यास्थितीत स्वयं नोंदणीद्वारे फार्मर आयडी प्रक्रिया सुरू झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याचाही उपयोग करून फार्मर आयडी काढून घ्यावा.

