पिंगुळीत १ जून रोजी चित्रकथी कार्यशाळा
कुडाळ
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला परंपरेचा अनुभव देणारी चित्रकथी कार्यशाळा १ जून रोजी पिंगुळी येथील ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरी येथे आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत होणार आहे.
चेतन गंगावणे या कार्यशाळेचे समन्वयक आहेत. ते आपले वडील पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी जतन केलेल्या या कलेचा वारसा जोपासत आहेत. ही कला जतन करण्यात परशुराम गंगावणे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोठे योगदान आहे. चित्रकथी ही ठाकर आदिवासी समाजाची पारंपरिक कला आहे. यामध्ये चित्रे, कथा. आणि संगीत यांचा अद्वितीय मिलाप असतो. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्यांना ही जुनी व लुप्त होत चाललेली लोककला प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. चित्रकथी म्हणजे ठाकर आदिवासी कलेच्या परंपरेचा आत्मा आहे. ही कला लोकांनी अनुभवावी, शिकावी आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवावी, हेच ध्येय असल्याचे चेतन गंगवणे यांनी सांगितले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांसह सर्व वयोगटातील मंडळी सहभागी होऊ शकतात. अधिक माहितीसाठी चेतन गंगावणे, मोबा-९९८७६५३९०९-येथे संपर्क साधावा, असे आवाहन ठाकर आदिवासी कला आंगण म्युझियम अँड आर्ट गॅलरीतर्फे करण्यात आले आहे.

