*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सुलक्षा मदन देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*दोन मिनिटाचे रिल्स आणि बदललेली मानसिकता*
आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया चे वर्चस्व वादातीत आहे. दोन मिनिटांचे रिल्स हे तंत्रज्ञानाचे अद्भुत उदाहरण..
पूर्वीच्या काळी माणूस माहिती, ज्ञान आणि मनोरंजनासाठी व्याख्यानांकडे, पुस्तकांकडे वळायचा. परंतु ‘कालाय तस्मै नमः’ म्हणतात तसं ह्या गोष्टींची एक जागा इंस्टाग्राम रिल्स सारख्या ‘व्हील’ ने घेतली आणि हे ‘व्हील’ असे आहे की एकदा का त्या चाकावर बसले की आपण कुठे आणि किती फरफटत जातो याचे भान ही राहत नाही.
सारा काही दोन मिनिटाचा खेळ असतो. त्यात हसू, आंसू, राग, द्वेष, मोटिवेशन यासारख्या अनेक शॉर्ट टर्म भावनांचे खेळ असतात. त्याची लाट ती जेवढी जोरात येते तेवढीच ती ओसरून पण जाते.
यामुळे दीर्घकाळ एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं हे नंतर नंतर कठीण वाटायला लागते. सतत नवीन, वेगवेगळ्या विषयावरच्या रिल्ससाठी जेव्हा सर्फीन्ग होते तेव्हा चटक तर लागतेच पण मनाचा अस्वस्थपणा वाढून एकाग्रता कधी कमी झालेली असते हे लक्षात ही येत नाही.
दोन मिनिटाच्या रिल्स ह्या नकारात्मक पद्धतीने जर एवढ्या प्रभावी होत असतील तर त्या योग्य रित्या घेतल्या तर खरंच सकारात्मक रित्या प्रभावी होऊ शकतात. गरज असते मनावरच्या संयमाची आणि काय बघावं पेक्षा काय बघू नये आणि किती काळ बघावे हे कळण्याची आणि कुठला कंटेन्ट किती प्रमाणात ऍब्सोर्ब करावा याची.
पण याचा सारासार विचार करायची क्षमता जेव्हा संपते, तेव्हा रिल्स मधलं आभासी जग आणि वास्तविक जग यातला फरक ही कळेनासा होतो आणि मग उरतं ते फक्त नैराश्य आणि अस्वस्थता.
सतत स्क्रीन कडे पाहणं, सतत मान खाली घालून बघत बसणं याचे दुरगामी काय परिणाम होऊ शकतात हे समजण्याच्या पलीकडे बुद्धी जाऊन, बुद्धीला रिल्स या नावाचा गंज चढलेला असतो. लाईक्स, कंमेंट्स, ट्रोलिंग च्या नकारात्मक मानसिकतेत यंत्रवतपणे जखडले जाणे यासारखे दुर्दैव नाही. सदसदविवेकबुद्धी बाजूला ठेवून ट्रेंड फॉलो करणे इतपत चुकीच्या विचारा पर्यंत पोचलो आहोत याची जाणीव ही मरून गेलेली असते.
हे दोन मिनिटाचे रिल्स हे दोन मिनिट वाल्या मॅगी नूडल्स सारखे आहेत, चविष्ट, तोंड चाळवेल असं चटकदार पण तितकेच मनाच्या आणि शरीराच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे.
*सौ. सुलक्षा मदन देशपांडे*
