सावंतवाडीत ‘तिरंगा रॅली’ द्वारे भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम
सावंतवाडी
पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा बळी गेल्यानंतर भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ सारख्या धाडसी कारवाईने पाकिस्तानच्या दुष्कृत्याला चोख प्रत्युत्तर देत त्यांना नामोहरम केले. या शौर्यवान सैनिकांना ‘सलाम ‘ करण्यासाठी आणि देशाच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखल्याबद्दल अभिमान व्यक्त करण्यासाठी आज सावंतवाडी शहरात सर्वपक्षीय तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले.
माजी शालेय शिक्षण मंत्री तथा स्थानिक आमदार दीपक केसरकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या रॅलीने संपूर्ण शहर दणाणून सोडले. गांधी चौकातून सुरू झालेली ही भव्य रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरत शिवराम राजे पुतळ्यापाशी समाप्त झाली. हातात तिरंगा ध्वज घेऊन “भारत माता की जय” असा जयघोष करत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले होते. पावसाची पर्वा न करता, भारतीय सैन्य दलाच्या अतुलनीय कार्याचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी अनेकांनी उत्स्फूर्तपणे या रॅलीत सहभाग दर्शवला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दीपक केसरकर यांनी सैन्य दलाच्या शौर्याचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले, “पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या क्रूर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय पर्यटकांचे नाहक बळी गेले, मात्र ऑपरेशन सिंदूर सारख्या धारदार हत्याराने भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानच्या दुष्कृत्याला प्रत्युत्तर देत चारी मुंड्या चित करून देशांच्या सौभाग्यवतींच्या कुंकवाची लाज राखली. त्या सैन्य दलाच्या सैनिकांना वंदन करण्यासाठी सावंतवाडीतून तिरंगा रॅली निघते याचा आपल्याला अभिमान आहे.”
आमदार केसरकर पुढे म्हणाले की, भारतीय सैनिकांच्या शौर्याला वंदन म्हणून देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या शूर जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना या रॅलीच्या माध्यमातून वंदन करतानाच ज्या पर्यटकांचे बळी गेले, त्यांनाही आदरांजली अर्पण करतो. संस्थानकालीन थोर परंपरा असलेल्या या सावंतवाडीच्या भूमीतून ही रॅली निघते याचाही आपल्याला अभिमान वाटतो, असेही आमदार केसरकर यांनी नमूद केले.
या तिरंगा रॅलीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखम राजे भोसले, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, भाजपाचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर, भाजपाचे वेंगुर्ला तालुका अध्यक्ष बाळू देसाई, सेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी,भाजपचे आंबोली मंडल अध्यक्ष तथा कोलगाव सरपंच संतोष राऊळ, भाजपा महिला शहरप्रमुख मोहिनी मडगावकर, संदीप गावडे, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अक्षय पार्सेकर, पुखराज पुरोहित, माजी नगरसेवक मनोज नाईक, ॲड.परिमल नाईक, उदय नाईक, सुरेंद्र बांदेकर, गुरु मठकर, दिपाली भालेकर, शर्वरी धारगळकर, भारती मोरे, शुभांगी सुकी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, संदीप हळदणकर, हर्षद ढेरे, अर्चित पोकळे, सुधा कवठणकर, मेघना राऊळ आदी सर्वपक्षीय महिला पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


