You are currently viewing शेतीपूरक योजना ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत – आम. निलेश राणे

शेतीपूरक योजना ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत – आम. निलेश राणे

कुडाळ येथे उमेद महिला मेळावा आणि औजार वाटप कार्यक्रम संपन्न

कुडाळ :

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांच्या वतीने आज वासुदेवानंद हॉल कुडाळ येथे उमेद महिला मेळावा आणि औजार वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन आम. निलेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.

आमदार निलेश राणे म्हणाले, कुठलीही व्यवस्था ही महिलांसाठी असुदे किंवा पुरुषासाठी असुदे. जेव्हा एक आर्थिक व्यवस्था म्हणून आपण उभी करीत असतो. त्यावेळी त्या आर्थिक व्यवस्थेमध्ये सगळे काही नीट आहे ना. कुठे गळती नाही ना. सगळीकडे तो निधी पोहोचतो की नाही. यावर लक्ष ठेवणे हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचे व तुम्हा अधिकारी वर्गाचे काम आहे. काही प्रभाग असे आहेत की आजही त्यांच्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचलेल्या नाहीत. अनेक महिला आजही या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे या योजनेपासून वंचित राहिलेल्याना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहूया. तुमचा एक भाऊ म्हणून तुम्हाला शासन दरबारी काय अडचण येत असेल तर आपल्याला सांगा. तुमची सगळी व्यवस्था आमदार निधीतून नाही तर माझ्या स्वतःच्या निलेश राणे निधीतून केली जाईल, असा शब्द आमदार राणे यांनी यावेळी दिला.

यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, कुडाळ तालुका अभियान व्यवस्थापक गणेश राठोड, कुडाळ पंचायत समिती प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, जि. प. माजी अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, अरविंद करलकर, उमेद कर्मचारी संघटना अध्यक्षा उषा नेरूरकर, उपाध्यक्षा सोनाली सावंत, सचिव रंजना मेस्त्री, साधना माडये, निलेश तेंडुलकर, राकेश कांदे आदी महिला बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

यावेळी अवजार बँक मधून कुडाळ तालुक्यातील दहा ग्राम संघांना 50 लाख रुपयांचे शेतीपूरक साहित्याचे वितरण आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रभारी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर यांनी या महिला उमेद मेळाव्यात शासनाच्या माध्यमातून शेतीपूरकची अवजारे मिळाली आहेत. त्या अवजारांचा महिलांनी वापर करावा. आपल्या भागातील ज्यांना यंत्राची गरज पडेल त्यांना भाड्याने देणे आवश्यक आहे. शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान वापरून अधिक प्रगती कशी करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल करावी. यासाठी तुम्हाला कृषी सखी मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दीपलक्ष्मी पडते यांनी महिलांना आर्थिक दुसऱ्या सक्षमीकरण करणे यासाठी दहा प्रकारची शेतीपूरक उपकरणे देण्यात आली आहेत तसेच महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कट्टीबद्ध आहे असे सांगितले. प्रास्ताविकात साधना माडये यांनी या योजनेसाठी शासनाने कोट्यावधी निधी दिला आहे, असे सांगून कुडाळ तालुक्यात 103 ग्राम संघातर्फे सुमारे 1791 समूह उमेद अभियानाला जोडलेले आहेत असे स्पष्ट केले तसेच उमेदच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला.

यावेळी माणगाव प्रभाग समन्वयक हेमंत मेस्त्री, आंब्रड ओरोसच्या मनीषा कांबळी, पिंगुळी तेंडोली सुप्रिया वालावलकर, वेताळबांबर्डे पावशी ज्योत्स्ना जाधव, घावनाळे नितीन गावडे, सामुदायिक कृषी व्यवस्थापक रसिका राणे यांचा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सूत्रसंचालन निलेश गुरव यांनी केले. कार्यक्रमाला कुडाळ तालुक्यातून नऊ प्रभाग संघातील सीआरपी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा