You are currently viewing निराकार तू निर्गुण ईश्वर

निराकार तू निर्गुण ईश्वर

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम ललित लेख*

 

*निराकार तू निर्गुण ईश्वर*

 

 

निराकार तू निर्गुण ईश्वर

भक्तांसाठी झाला सगुण साकार

साठविता नेत्री. रूप मनोहर

उमडला अंतरी ,अनन्य भाव सागर.

 

ईश्वर ..भगवंत..देव..परमात्मा मुळांत निर्गुण निराकारच आहे.‌

त्याला कुठलीही उपाधी नाही..रूप नाही. रंग नाही..आकार नाही.तो निर्गुण आहे. गुणरहीत आहे.‌ सामान्य जीवा समोर त्याचे कुठलेही रूप नसल्याने त्याची भक्ती करण्यांत अनेक अडथळे येतात. निर्गुण निराकारापर्यंत पोहचणे हे अतिशय कठीण आहे.‌त्यासाठी जन्मोजन्मीची साधना आवश्यक आहे. पण साधना करतांना डोळ्यासमोर काहीतरी असणे आवश्यक आहे.‌ म्हणून भक्तांसाठी परमेश्वराने सगुण रूप धारण केले आहे.‌ नि त्याची साधना .जप तप केल्याने नि तेही निष्ठेने..प्रेमाने.. शरणागत होऊन.. ..अतूट विश्वास ..अनन्य भावाने केल्यास निर्गुण निराकारापर्यंत पोहचता येते. संतांनी यासाठी खूप सुंदर मार्गदर्शन केले आहे.‌

 

खरे तर सगुण रूपाचा साक्षात्कार होणे..दर्शन होणे हेही काही सोपे नव्हे.‌ तसे कठीणच आहे. दशरथाने कैकेयीला दिलेले वचन पाळण्याचे ठरविले तेव्हा सुमंतला रामास बोलवून आणण्यास सांगितले .रामाचे दर्शन होण्यासाठी

रामा पर्यंत पोहचण्यासाठी चौदा दरवाजे सुमंतास ओलांडावे लागले.‌

पहिला दरवाजा — पादत्राणेसोडावी लागली. दुसरा दरवाजा –आभूषणे सोडावी लागली. तिसरा दरवाजा –द्वेष.. चौथा दरवाजा ममत्व..पाचवा दरवाजा..अहंता .अहं .सोडावा लागला.‌ सहावा दरवाजा — वासना नि सातव्या दरवाज्याजवळ देहत्व भाव सोडावा लागला.‌. देवाजवळ जायचे तर असा त्याग निश्चित करावा लागतो.‌ इतके करूनही रामाचे दर्शन झाले नाही. त्यापुढे आणखी सात दरवाजे होते. हे दरवाजे ओलांडताना काही प्राप्त करून घ्यावे लागते.आठवा दरवाजा — श्रवण..नववा दरवाजा..चिंतन..दहावा दरवाजा — नित्य काय..अनित्य काय याचा विचार करावा लागतो..अकरावा दरवाजा..मनन बारावा दरवाजा– निदीध्यासन म्हणजे अखंड चिंतन.तेरावा दरवाजा…वैराग्य प्राप्ती नि चौदाव्या‌‌ दरवाजाजवळ गेला तेव्हा साक्षात्कार ..प्रभु दर्शन सुमंताला झाले. सगुण रूपाच्या दर्शनाला एवढे करावे लागते. तर निर्गुण निराकारासाठी केवढी तपस्या ..अनन्य भाव..शरणागत भाव .. श्रद्धा..विश्वास. कमालीची निष्ठा. लागत असेल कल्पना करा.

 

ही तपस्या पूर्णत्वास गेली कि जीव शिव मिलन होते.‌ अहं ब्रह्मास्मी असा साक्षात्कार होतो.‌ नि एक न संपणारा आत्मानंद मिळतो.‌ आत्मानंद मिळविणे सोपे नाही पण कठीणही नाही.‌ या साठी चराचरात सर्वत्र देवच व्यापलेला आहे याची सतत जाण ठेवावी लागेल. प्रत्येक प्राणीमात्रात देव आहे हे जाणावे लागेल.‌ जळी.. स्थळी..काष्ठी पाषाणी ..सर्वात ईश्वर रूप पहावे लागेल.‌ईश्वर म्हणजे चैतन्य.. ईश्वर म्हणजे आनंद.जीव जो ईश्ररापासून वेगळा नाही.‌, नि तोही ईशस्वरूपच.! सगुणांतच निर्गुण निराकार परमात्मा सामावलेला आहे. ,ह्याची जाणीव होईल.‌जसे

 

पाणी आणि बर्फ|तूप थिजलेले |

घृत विरलेले | एक आहे.

तैसे तुझे रूप| दोन नाही एक|

जाणती भाविक| एक तत्व|

 

म्हणून सगुणोपासना मनापासून .. शुद्ध अंत:करणाने..भाव भक्तीने.. समर्पण भावाने केली तर .सगुण दर्शन होऊ शकेल.‌ नि निर्गुण निराकार ईश्वर दर्शनासाठी वाटचाल सुरू होईल असं मला वाटतंय!

 

 

सौ.मंजिरी अनसिंगकर नागपूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा