शक्तीपीठ महामार्गाला उबाठा शिवसेनेचा विरोध
हिंम्मत असेल तर आंदोलन मोडून दाखवा – माजी खा. विनायक राऊत…
सावंतवाडी
शक्तीपीठ महामार्ग हा 800 किलोमीटर लांबीचा असून त्याकरिता 86 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या महामार्गामुळे शेतकऱ्यांची 27 हजार एकर शेत जमीन रस्त्याखाली जाणार आहे. 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे कोकणातील निसर्गाचा समतोल बिघडणार आहे. सिंधुदुर्गातील बारा गावांचा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध असून उबाठा शिवसेना आणि आम्ही शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या बागायतदार व शेतकऱ्यांच्या पाठीशी असून या शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध आहे. आमच्या पक्षाचे डॉ. जयेंद्र परुळेकर हे या आंदोलनाचे नेतृत्व पहिल्यापासूनच करत आहेत. शासनाचा हा डाव हाणून पडण्यासाठी आम्ही रणांगणात उतरलो आहे. हिंम्मत असेल तर आमचे आंदोलन धमकी देणाऱ्यानी मोडून दाखवावे, असे आव्हान माजी खासदार विनायक राऊत यांनी आज सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दिले. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, विधानसभा संपर्क प्रमुख रुपेश राऊळ, तालुका प्रमुख मायकल डिसोझा, रमेश गावकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विकासाला आमचा विरोध नाही मात्र जमिनी हडप करण्याच्या विरोधात आम्ही आहोत. पोकळ धमक्या देण्याचा खासदार नारायण राणे यांचा मूळ स्वभाव गेला नाही हे दुर्दैव आहे. शक्तिपीठाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. हिंम्मत असेल तर आमच्या तांगड्या तोडायला या. आम्ही सत्याच्या बाजूने असून शेतकऱ्यांना नामशेष करणारा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असे खासदार राऊत म्हणाले.
शक्तीपीठ महामार्गापेक्षा कोकण पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई गोवा महामार्ग व कोस्टल रोड ( सागरी महामार्ग ) येथील जनतेला महत्त्वाचा व फायद्याचा आहे. या कोस्टल रोड साठी 9700 कोटीची तरतूद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबई गोवा महामार्गासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच जून पर्यंतची अंतिम तारीख दिली आहे. तरीही आणखी एक वर्ष हा महामार्ग पूर्ण होणार नाही असे विनायक राऊत यांनी सांगितले. चिपी विमानतळावर सिंधुदुर्ग मुंबई विमान सेवा सुरू करण्याची ताकद नारायण राणे यांच्यात नाही. तर सावंतवाडीसाठी मंजूर असलेले मल्टिस्पेशालीटी हॉस्पिटल कुजविण्याचे काम आमदार दीपक केसरकर यांनी केले. त्यांचा इगो आणि माझा हट्ट पुरा झालाच पाहिजे यासाठी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आमदार दीपक केसरकर यांनी रखडविल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.

