You are currently viewing ‘आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ – प्रा. डॉ. संजय कळमकर

‘आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ – प्रा. डॉ. संजय कळमकर

*’आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ – प्रा. डॉ. संजय कळमकर*

*श्री स्वामी समर्थ व्याख्यानमाला – अंतिम पुष्प*

पिंपरी

‘सभोवतालच्या छोट्या – छोट्या गोष्टीत आनंद आहे; पण तो शोधायची दृष्टी पाहिजे. तसेच आनंद वाटल्याने अधिक वाढतो!’ असे प्रतिपादन प्रा. डाॅ. संजय कळमकर यांनी श्री स्वामी समर्थ मंदिर प्रांगण, शिवतेजनगर, चिंचवड येथे शनिवार, दिनांक १७ मे २०२५ रोजी केले. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान आयोजित तीन दिवसीय श्री स्वामी समर्थ व्याख्यानमालेत ‘आनंदी जीवनाच्या वाटा’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना संजय कळमकर बोलत होते. सर्जेराव भोसले अध्यक्षस्थानी होते; तसेच समन्वयक राजेंद्र घावटे, शैलेश मोरे, श्रीकांत करवले, सोपान खेडकर, विजय महल्ले, राजू वसुले, संजय काकड, सतीश भेंडे, सुनील कदम, श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण बहिरवाडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

नारायण बहिरवाडे यांनी प्रास्ताविकातून, ‘दहा पुस्तकं वाचून मिळवलेले ज्ञान एका व्याख्यानातून सहजपणे प्राप्त होते म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून या वर्षापासून व्याख्यानमालेचा प्रारंभ केला. प्रतिष्ठानमार्फत वर्षभर विविध आध्यात्मिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येतात!’ अशी माहिती दिली. व्याख्यानापूर्वी, वयाच्या ६९व्या वर्षी वीस दिवसांत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात दुचाकीवरून भ्रमंती करीत स्वच्छतेचा संदेश पोहोचवणाऱ्या यशवंत कन्हेरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

प्रा. डाॅ. संजय कळमकर पुढे म्हणाले की, ‘जगातील १४२ देशांचे सर्वेक्षण करून आनंदी देशांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये फिनलँड प्रथम क्रमांकावर होता; तर भारत १२६व्या क्रमांकावर होता; परंतु विनोदाची अन् खेदाची बाब म्हणजे पाकिस्तान १०८ क्रमांकावर होता. त्यामुळे भौतिक समृद्धी म्हणजे आनंदी जीवन नव्हे. उलट जुन्या काळातील माणसे समाधानी होती. पूर्वी गरिबीतही आनंद, सुख, समाधान मिळत होते. आता विज्ञान – तंत्रज्ञानाचा अतिरेक होत आहे. मोबाइल हे त्याचे दैनंदिन उदाहरण आहे. पुस्तक वाचनाची आवड, चांगले छंद आणि नाती जपल्याने जीवनातील आनंदाच्या अनेक वाटा गवसतील!’ प्रासंगिक विनोद, शाब्दिक विनोद, किस्से, दैनंदिन जीवनातील विसंगतीवर मार्मिक भाष्य करीत कळमकर यांनी श्रोत्यांना खळखळून हसवत प्रबोधन केले.

राजेंद्र घावटे यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. दीपक पाटील, कल्याण वाणी, नंदकुमार शिरसाठ, प्रशांत पाटील, जितेंद्र छाबडा, किशोर थोरात, सागर मोरे, आर. व्ही. राणे यांनी संयोजनात सहकार्य केले. तेजस्विनी बडे यांनी सूत्रसंचालन केले. सारिका रिकामे यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा