*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*देवघर …माझ्या घरचं..!!*
माझ्या देवघरातील देव
कधीच हद्दपार झालेत
आई सोबत!तेही माझ्या
घराला सोडून गेलेत….!
आजही देवघर तिथेच आहे
पण तिथे कुणी राहत नाही
सुगंध कापूराचा दरवळतो
पेटवाया कुणाचे हात नाही ..!
दारावरचा देवही झाला म्हातारा
त्याला देवघर कधीच दिसलं नाही
देवाने जरी मला ….पोरकं केलं
घराने मला परकं केलं नाही ..!
देवमुर्ती तस्वीरी ..घरभर राहतात
आशीर्वाद त्यांचे इथे राहत नाही
आई आजीने लाड केले तयांचे
लाड करायला..माझं कुणी नाही..!
आजही देवघरापुढे उदबत्ती फिरवतो
पूर्वसंध्येलाच सुगंध दरवळत जातो
तेही माझ्या आई आजी!घरा करता !
तेवढं तर !मी नक्कीच करू शकतो..!
दारावरचा देव …बघून हसतो
त्याच्याभोवती तीनदा फिरवतो
माझ्या आई आजी …घराकरताचं
उदबत्ती घरभरं फिरवतो..मग मी हसतो
देव हसतो..मी हसतो..घरं हसतं..
बाबा ठाकूर

