*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका सौ. सुलक्षा मदन देशपांडे लिखित अप्रतिम लेख*
*स्थलांतर*
‘स्थलांतर’ म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक होण्यासाठी होणारी हालचाल होय. माणूस हा अनादी काळापासून मूलभूत गरजांच्या शोधात स्थलांतर करत आहे आणि हे चक्र अद्ययावत चालू आहे.
स्थलांतर वैयक्तिक, कौटुंबिक किंवा मोठ्या समुदायाच्या स्वरूपात घडते. शिक्षण, नोकरी, चांगल्या जीवनशैलीचा शोध, नैसर्गिक आपत्ती, सामाजिक असुरक्षितता किंवा राजकीय परिस्थिती ही कारणे प्रामुख्याने दिसून येतात.
सध्या मुख्यत्वे गावाकडून शहराकडे होणारे स्थलांतर वाढले आहे. विशेषतः कोविड नंतर तर जास्तच. शिक्षणासाठी, वीज, पाणी सारख्या सोयीसुविधांसाठी तसंच आरोग्यसेवेच्या आणि नोकरीच्या संधीं शहरात अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध असतात म्हणून लोक मोठ्या प्रमाणावर शहरांकडे वळतात. परंतु याचा परिणाम असा होतो की त्यामुळे शहरांवर लोकसंख्येचा भार वाढतो आणि सामाजिक व आर्थिक समस्या उद्भवतात.
कधी कधी स्थलांतर परदेशातही होते. परदेशात अधिक चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, शिक्षण व उच्च राहणीमान मिळवण्यासाठी अनेक जण स्थलांतर करतात. याला ‘आंतरराष्ट्रीय स्थलांतर’ असे म्हणतात. स्थलांतरितांना सुरुवातीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते उदा. तिथले हवामान, भाषा, संस्कृती, आर्थिक समस्या आणि कधी कधी दुय्यम वागणूक.
आपल्या भारतातून गेल्या काही वर्षात नोकरीं व शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात स्थलांतर करायचे आणि तिथेच स्थायिक व्हायचे प्रमाण खूप वाढले आहे. परदेशात तिथलेच होऊन राहताना तडजोड करून सुस्थापित झालेल्या, भारतातील आत्ताच्या पिढीच्या बाबतीत मात्र भावनिक स्तरावरही काही गोष्टींना त्यांना सामोरे जावे लागते आणि याचीच एक बाजू म्हणजे आयुष्याच्या उत्तरार्धात आल्यावर जेव्हा त्यांना आपल्या देशाची माती खुणावू लागते तेव्हा ‘ ने मजसी ने परत मातृभूमीला ‘ म्हणत मात्र ते हतबल होताना दिसतात.
प्रसिद्ध बंगाली कवी, नाटककार, कादंबरीकार आणि समाजसुधारक गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे स्थलांतराच्या सांस्कृतिक परिणामावर भाष्य करताना म्हणतात की माणसांचे जीवन म्हणजे एक प्रवास आहे. स्थलांतर हे त्या प्रवासातील एक नैसर्गिक टप्पा आहे. त्यातून नवीन संस्कृती जन्माला येतात.
शाळेतल्या इतिहासाची सुरवात ही ‘आर्य-संस्कृती’ ने व्हायची. आर्य भारतात आले. हे एक मोठे स्थलांतर मानले जाते. आर्य समाजाने आपली संस्कृती, भाषा, सामाजिक आणि राजकीय व्यवस्था इथे रुजवली. याचा कात टाकावी तसा भारतीय उपखंडावर परिणाम झाला.
ऐतिहासिक घटना म्हणून पिढ्यानंपिढ्या स्मरणात राहतील अशा ही काही स्थलांतराच्या घटना घडल्या आहेत. भारताच्या आत्तापर्यंतच्या इतिहासातले सर्वात वेदनादायी स्थलांतर म्हणजे 1947 सालच्या भारत – पाकिस्तान फाळणीच्या वेळी झालेले स्थलांतर.
त्या स्थलांतराचे पडसाद आणि परिणाम आजही जीवनाच्या प्रत्येक स्तरावर दिसून येतात.
पत्रकार, लेखक, राजकारणी खुशवंत सिंग यांनी ‘ट्रेन टू पाकिस्तान’ या त्यांच्या कादंबरीत स्थलांतराचे प्रभावी चित्रण केले आहे.
तसेच अलीकडची घटना म्हटली तर युद्धाने त्रस्त असलेल्या सीरिया येथून लाखो नागरिकांनी युरोप कडे स्थलांतर केले. आजही जागतिक स्तरावर या घटनेमुळे स्थलांतर आणि निर्वासितांचा प्रश्न चर्चेत आहे.
इंग्रजांनी स्थलांतर करत जगावर राज्य केले. ते भारतात आले. आणि इथून गेले तेव्हा व्यापक स्वरूपात सामाजिक, मानसिक आणि राजकीय परिवर्तन करून गेले.
तर, स्थलांतरित जेव्हा स्थलांतर करतात तेव्हा ते फक्त माणसांचे स्थलांतर नसते तर ते असते ऐतिहासिक वारसा आणि संस्कृतीचे स्थलांतर, नवनवीन विचारधारांचे स्थलांतर आणि ओघाने येणाऱ्या नवीन स्वप्नांचे स्थलांतर आणि असे हे स्थलांतर हे त्या त्या स्थलांतरितांच्या मार्फत त्या राष्ट्राच्या, राज्याच्या, गावाच्या, शहराच्या परिवर्तनात मोलाची कामगिरी बजावते.
✍️©️®️
*सौ. सुलक्षा मदन देशपांडे*

