“भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा प्रभाव आणि परिणाम”… ॲड. नकुल पार्सेकर
आमच्या महाराष्ट्राचे सुपूञ , मुळ अमरावतीचे मा. भूषण गवई साहेब देशाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. आजपासून फक्त अवघ्या सहा महिन्याचा कालावधी त्यानां मिळणार आहे.
अनेक कारणांमुळे न्यायपालिका संशयाच्या भोवऱ्यात असताना एकंदरीत मा. भूषण गवई यांच्याकडून विशेषतः सामान्य माणसांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत. या क्षेत्रातील त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आणि काही महत्त्वाच्या खटल्या बाबत त्याने दिलेले अनेक निर्णय पहाता त्यांच्या बद्दल कायद्याचा एक विद्यार्थी म्हणून आदर तर आहेच पण अपेक्षापण आहेत. याचे कारण त्यांचा अनेकांना माहीत नसलेला सेवाभाव. अनेक गरजूंना आणि विशेषतः गरीब होतकरू मुलाना कोणत्याही प्रकारचा गवगवा न करता ते शिक्षणासाठी सातत्याने मदत करत असतात. सेवाभाव हा संस्कार त्यानां त्यांच्या स्व. पिताश्री कडून मिळालेला आहे. नि:पक्षपातीपणे न्यायदान करणे हा त्यांचा स्थायीभाव.
सर्वोच्च स्थानावर आरुढ होण्यापूर्वी त्यांनी केलेला अतिशय महत्त्वाचा संकल्प हा भारतीय न्यायव्यवस्थेला आशेचा किरण दाखवणारा आहे. मा. गवई साहेब म्हणाले, ” मी माझ्या निवृत्ती नंतर कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक लाभाचे राजकीय पद ( राज्यसभा सदस्य/ राज्यपाल इ.) स्वीकारणार नाही.
या महाराष्ट्रातील एक कर्तृत्ववान दलित मराठी माणूस आज देशाच्या न्यायपालिकेच्या सर्वोच्च स्थानी आरुढ झाला याचा मला मनस्वी आनंद आहे.
त्यांच्या नावातच “भूषण” आहे.. हे अवघ्या भारतवर्षाचे भूषण आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेबांना खरोखरच धन्य वाटले असणार. मा. गवई साहेब आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

