You are currently viewing शोध आनंदाचा

शोध आनंदाचा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*

 

*शोध आनंदाचा*

 

प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे अंधार नाही. सुख म्हणजे काय? जिथे दुःख नाही. पण दुःख म्हणजे तरी नेमके काय? ते कशाने होते?

 

भगवान गौतमांनी एकदा शिष्यांना सांगितले,

“मला सुखी माणसाचा सदरा हवा आहे.”

आणि एकाही शिष्याला तो गौतम बुद्धांना देता आला नाही. कारण जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. म्हणजे दुःखं सगळ्यांना आहेत. मग ती का आहेत? त्याची नेमकी कारणे कोणती? हे तपासले तरच आनंदाचा शोध घेता येईल.

 

खरं म्हणजे सुख आणि आनंद हे शब्द अर्थाने समान वाटत असले तरी भिन्न भाव दाखवणारे आहेत. आनंदी व्यक्ती नेहमीच सुखी असते कारण कोणत्याही परिस्थितीत आनंदाने कसं जगावं याचं शास्त्र, तत्त्व त्या व्यक्तीला उमगलेलं असतं. थोडक्यात “आनंद” हा व्यक्तीच्या वृत्तीत असतो. सुख मिळवण्यासाठी किंवा सुखाचा शोध घेण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीचे जीवन भरकटत जाण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे सुखाचा मार्ग शोधण्यापेक्षा आनंदाचा मार्ग शोधणे हे अधिक उचित नाही का?

 

 

माणसाच्या मनात अव्याहत विचार चालू असतात. माझ्याच वाटेला असे का?, मलाच हे का मिळू नये?, किंवा मला हे सारे कधी मिळणार?, माझ्या नशिबात इतरांसारखी सुखे का नाहीत? वगैरे वगैरे. जीवनभर त्याची धडपड चालू असते. तो सतत आपली तुलना याच्या त्याच्याशी करत असतो. आणि स्वतःच्या उणीवांना कुरवाळत बसतो.

 

एकदा एका प्राध्यापकाने एक मोठा पांढरा कागद विद्यार्थ्यांसमोर धरला. त्या कागदावर मध्यभागी एक छोटा काळा ठिपका होता. विद्यार्थ्यांना त्यांनी विचारले,

” तुम्हाला या कागदावर काय दिसत आहे?”

साऱ्यांचे उत्तर एकच होते.

” कागदावरच्या मध्यभागी असलेला अगदी छोटासा काळा ठिपका.”

दुःख याचेच आहे, की सभोवतालचा इतका मोठा शुभ्र कागद न पाहता सगळ्यांनी फक्त तो काळा ठिपकाच पाहिला. ही विचारातली नकारात्मकता आहे जी दुःखाचं मूळ कारण आहे. आपल्याकडे काय नाही पेक्षा काय आहे याचा विचार केला तरच माणूस सुखी होऊ शकतो. स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करू शकतो.

 

उत्तम क्रिकेट खेळणाऱ्या व्यक्तीच्या मनात जर विचार आला की,” गोलंदाजाने टाकलेला चेंडू बॅटला न लागता माझ्या डोळ्यांना लागला तर? फटकेबाजी करताना माझी बॅटच तुटली तर?

अशा एका क्रिकेट वीराला त्याच्या गुरुने सांगितले,

” अरे तू असा पॅव्हेलियन मध्येच आऊट नको होऊस.आधी मैदानात उतर आणि तुझी ताकद अजमाव.

 

पॅव्हेलियन मध्ये आऊट होणं याचाच अर्थ आयुष्यात केवळ भयानेच कच खाणं. पाण्यात उडी टाकली की पोहता येईलच याची खात्री नसली की हे भय अंतरिक सुखाचा, पर्यायाने आनंदाचा नाश करते.

एक धागा सुखाचा

शंभर धागे दुःखाचे

जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे…

हे ज्याला समजतं आणि सर्व धागे घेऊन जो आयुष्याचे वस्त्र विणतो तोच आनंदी होतो.

भयापासून, स्वार्थापासून, स्पर्धेपासून, अपेक्षांपासून दूर जाणारी आणि समस्यांना थेट भिडणारी व्यक्तीच आनंदाने जगू शकते. आनंद निर्माण करू शकते आणि त्यालाच समजलेला असतो जगण्यातला आनंद.

 

कवी शेले म्हणतो,

we look before and after and pine for what is not.

 

आपण नेहमीच भूत आणि भविष्याचा विचार करतो आणि असमाधानी राहतो.

पण जो “कशाला उद्याची बात” ही भावना बाळगून वर्तमानात जगतो, आनंदाचे क्षण वेचत राहतो तो खरा जगतो. याचा अर्थ तो स्वैर आहे किंवा बेपर्वा आहे असा नसून तो काल्पनिक चिंतेच्या खेळात न रमता आता हातात असलेला डाव कसा कौशल्याने खेळावा याचा विचार करतो. आव्हानात आनंद

मानतो म्हणून मजेत राहतो. रचनात्मकतेने जगण्याचं भान राखणं म्हणजेच आनंदपथावरचे चालणे.

 

सुखाला मोजपट्ट्या आहेत. पैसा, कीर्ती,

शिक्षण वगैरे कितीतरी. पण आनंदाला भौतिकतेची मापं नाहीत. तो अमर्याद,अनंतात सर्वत्र असतो. फक्त त्याचा अनुभव घ्यायचा असतो.

 

राधिका भांडारकर

प्रतिक्रिया व्यक्त करा