राज्यात बुधवारी (ता. २७) पाचवी ते आठवीचे सर्व वर्ग कोरोना नियमांचे पालन करत सुरू झाले. मात्र, आदिवासी विकास विभागातर्फे चालविल्या जाणाऱ्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य निवासी स्कूलमधील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास फेब्रुवारी उजाडणार असल्याची स्थिती आहे.
राज्यात शासकीय व अनुदानित एक हजाराहून अधिक निवासी, तर २५ एकलव्य स्कूल आहेत. या ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबाबतचा अभिप्रायच शासनाने सोमवारी (ता. २५) पत्राद्वारे मागविला.
त्यानुसार आयुक्तालयाकडून प्रकल्प कार्यालयांना माहिती सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील दोन ते तीन दिवसांत वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय
बुधवारपर्यंत आदिवासी आयुक्तालयात पूर्ण माहिती न आल्याने आश्रमशाळांतील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झालेले नाहीत. आयुक्तालयात माहिती मिळताच त्यानुसार पुढील दोन ते तीन दिवसांत वर्ग सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे आदिवासी विकास विभागातर्फे सांगण्यात आले.