You are currently viewing टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचे सावंतवाडीत सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन

टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचे सावंतवाडीत सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन

कोकणात दर्जेदार बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध – अध्यक्ष शरद गांगल

सावंतवाडी अर्बन बँकचे टीजेएसबी बँकेत विलीनीकरण

सावंतवाडी :

समाजाचा सर्वोत्तम विकासाचा मार्ग हा सहकार क्षेत्रातून खुला होतो. टीजेएसबी बँकेचा प्रवास हा नेहमीच ग्राहकांना उत्तम सेवा देणारा तसेच दर्जेदार बँकिंग सेवा पुरविणारा ठरला आहे. या बँकेला एक शिस्त आहे. शिस्तीच्या जोरावर ग्राहकांचे हित ही बँक जोपासते. सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे टीजेएसबी सहकारी बँकेत विलीनीकरण हा प्रशंसनीय उपक्रम आहे. अशा विलीनीकरणामुळे दर्जेदार बँकिंग सेवा दुर्गम भागांपर्यंत पोहोचतात. यामुळे आर्थिक समावेशाला चालना मिळेल, स्थानिक ग्राहकांना मजबूत आर्थिक पर्याय मिळतील व सहकारी बँकिंग क्षेत्र अधिक स्थिर बनेल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडीत केले. तब्बल ७८ वर्षाची परंपरा लाभलेल्या सावंतवाडी अर्बन बँकेचे आज टीजेएसबी सहकारी बँकेत विलीनीकरण झाले. या सोहळ्याचे उद्घाटन माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, माजी मंत्री दीपक केसरकर, बँकेचे अध्यक्ष शरद गांगल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर, उपाध्यक्ष वैभव सिंगवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्जुन चांदेकर, सौ. उमा प्रभू, सामाजिक कार्यकर्ते अॅड. नकुल परसेकर, अर्बन बँकेचे माजी संचालक अँड. सुभाष पणदुरकर, रमेश बोंद्रे, रमेश पै, अच्युत सावंत भोसले, अशोक दळवी, राजन पोकळे, प्रसाद देवधर, नकुल पार्सेकर, वाय. पी. नाईक, गोविंद वाडकर, मिहीर मठकर, सीमा मठकर, व्यवस्थापक सुनील परब आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावंतवाडीत सुरू करण्यात आलेली शाखा ही १५० वी शाखा आहे. त्यामुळे आता आम्ही कोकणात सुद्धा ग्राहकांना दर्जेदार सेवा देऊ, असा विश्वास बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी व्यक्त केला. TJSB चे अध्यक्ष शरद गांगल पुढे म्हणाले, हे विलीनीकरण हा केवळ विस्तार नाही, तर आम्ही को-ऑपरेटिव्ह बँकिंग क्षेत्रातील आमची उपस्थिती अधिक व्यापक करत आहोत. सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण विभागातील आमचा विस्तार आता अधिक बळकट झाला आहे. या भागातील नागरिक, व्यावसायिक, उद्योजक यांना उत्तम बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा टप्पा आम्हाला सर्वसमावेशक आर्थि विकासाच्या दिशेने पुढे नेणारा आहे. आम्ही कायम सव धारकांच्या हितासाठी शाश्वत वाढीवर विश्वास ठेवतो. सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विलीनीकरणामुळे आमचा को-ऑपरेटिव्ह बँकिंग नेटवर्क अधिक मजबूत झाला आहे. आमचा उद्देश आहे की, ग्राहकांना उत्तम बँकिंग अनुभव देताना, अर्थिक स्थैर्य व सुविधा यांचे संतुलन राखले जावे.

यावेळी माजी मंत्री तथा सावंतवाडी मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर म्हणाले, या विलीनीकरणामुळे सिंधुदुर्ग विभागातील आर्थिक पायाभूत सुविधेला बळ मिळणार आहे. टीजेएसबी बँकेचे व्यापक नेटवर्क, आधुनिक तंत्रज्ञान व ग्राहककेंद्रित सेवा स्थानिक उद्योजकांना, व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सेवा देईल. हे पाऊल आर्थिक समृद्धीकडे जाणारा मार्ग ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा