*मळगाव येथील निवृत्त शिक्षक गणू यशवंत राऊळ यांचे वृद्धापकाळाने निधन*
मळगाव:
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव, पिंपळवाडी येथील निवृत्त शिक्षक गणू यशवंत राऊळ (वय ९३) यांचे सोमवार दिनांक १२ मे रोजी रात्री १० वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. गेले काही दिवस त्यांच्यावर सावंतवाडी कोलगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचाराला साथ देत नसल्याने त्यांना घरी नेण्यात आले होते.
नाना मास्तर या नावाने परिचित असलेले गणू राऊळ हे कणेरी मठाचे सद्गुरू प.पू.श्री.काडसिद्धेश्वर स्वामींचे निस्सिम भक्त होते. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही ते आध्यात्मिक प्रवचन करायचे. सावंतवाडी येथील श्री काडसिद्धेश्वर सेवा समिती ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते. मठातील आध्यात्मिक कार्यक्रम असो किंवा सामाजिक उपक्रम त्यांचा हात नेहमीच मदतीसाठी पुढे असायचा. गोरगरिबांना देखील औषधोपचारासाठी ते सढळ हस्ते मदत करायचे. त्यांच्या याच उदात्त वृत्तीमुळे त्यांच्या जाण्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केली. मंगळवारी सकाळी मळगाव येथेच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे.

