*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगिता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*मला भेटलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व — सुमेधा चिथडे*
माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला अनेक अलौकिक जी माणसे भेटली त्यापैकीच एक सुमेधाताई चिथडे.
आयुष्यातल्या अनोख्या अनुभवांसारखी वेगवेगळ्या टप्प्यांवर भेटलेली माणसं मनाच्या कप्प्यात अलगद विसावतात.. अल्पकाळ वेडावणारी तर कधी दिर्घकाळ रेंगाळणारी पण मनाच्या अंगणात त्यांच्यातील अपूर्वाई तशीच राहते…हे तरल अस्तर उलगडताना मला भेटलेल्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी…
“घास रोज अडतो ओठी सैनिकहो तुमच्यासाठी” हे गदिमांच्या गीतेतील शब्द यथार्थ ठरविण्याचे काम करणारी “सोल्जर्स इंडिपेन्डन्ट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन अर्थात ‘सिर्फ’ ही संस्था
या संस्थेच्पा सुमेधा ताई… यांच्याशी
भेटण्याचा योग आला तो “निनाद फाऊंडेशन” तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात.
अर्ध-अधिक आयुष्य हातातून निसटून गेल्यावर मागे वळून बघताना सहज विचार येतो की आपल्याला काय मिळालं ?आणि आपण काय गमावलं ?
“दृष्टी तिथे सृष्टी”’ जशी आपणांस भावते, उमगते आपण अनुभवतो तशी ती आपल्यापर्यंत पोहचते..अशीच “दृष्टी तिथे सृष्टी”’ आपणांस भावली, उमगली, आपण अनुभवली तशी त्यांनी आम्हाप्रती पोहचविली… भावस्पर्शी प्रसंगांनी, आठवणींनी मनाचा ठाव घेतला… मनमंदीर आपल्या भव्य-दिव्य, उदात्त धुंद- गंध विचारांनी भरून गेलं. आपला दृष्टीकोन माझ्या मनाला भिडला व आवडला..
“दृष्टि’”कोनामुळे खरंतर नवीन दृष्टी मिळाली.. एक वेगळा “दृष्टीकोन ” शिकण्यास मिळाला.
“रुक जाना नहीं, तू कहीं हार के”… या पंक्तीला साजेशी वाटचाल करणा-या सुमेधाताई… मला भेटलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व…!
आपण सगळेच मंदिरात देव शोधायला जातो पण आत असते ती पाषाणमूर्ती…खरा देव मंदिराच्या पायरीवर बसलेल्या माणसाच्या हृदयात असतो..
“देखणी ती पाऊले जी
ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुध्दा
स्वस्तिपद्मे रेखिती’
या कवी बा. भ. बोरकरांच्या कवितेच्या ओळी
सुमेधाताई यांना अगदी तंतोतंत लागू पडतात… एका वेगळ्याच भावविश्वात जगणा-या… गोष्ट असामान्यांची…
सियाचिन येथे सैनिकांसाठी “ऑक्सिजन जनरेशन प्लांट”‘ उभारणाऱ्या सुमेधा चिथडे यांनी व्याख्यानातून सैनिकी जीवनाची दाहकता मांडत जनजागृती केली..
सियाचीन… हिमालया मधली जगातली सर्वांत उंच युद्धभूमी. जिकडे बघू तिकडे केवळ बर्फ आणि बर्फच.. सोबतीला उणे ६० अंश तापमान, तुफानी वेगाने वाहणारे थंडगार वारे, आजूबाजूला बर्फाळ दऱ्या, अचानक सुरू होणारी बर्फवृष्टी, वादळ आणि प्राणवायूची म्हणजेच ऑक्सिजनची कमतरता मात्र अशी विषम परिस्थिती असलेल्या या जागेचे सामरीकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. कारण एका बाजूला पाकिस्तान तर दुसऱ्या बाजूला चीन मात्र सियाचीन भारताच्या ताब्यात असल्याने या दोन्ही शेजाऱ्यांच्या कारवायांवर अंकुश ठेवणे भारताला शक्य आहे.
सियाचीनमध्ये वर्चस्व मिळविण्यासाठी पाक आणि चीन आजही प्रयत्न करत असतात. मात्र भारतीय सैन्याने त्यांचे एकही प्रयत्न यशस्वी होऊ दिलेले नाहीत… भारतीय सैनिक जगातील या सर्वांत उंच युद्धभूमीवर समर्थपणे उभे आहेत मात्र हे वाटते तेवढे सोपे नाही. उणे ६० अंश तापमानामध्ये आजूबाजूला केवळ बर्फ असताना तेथे थांबणे हे शारीरिक आणि मानसिक कसाची परीक्षा पाहणारे त्यासाठी भारतीय लष्करातील जवानांना विशेष प्रशिक्षणही दिले जाते मात्र येथे सज्ज राहणे हे अजिबात सोपे नाही कारण हे ठिकाण अतिशय उंचावर असल्याने नैसर्गिकरीत्याच प्राणवायूची कमतरता येथे आहे त्यामुळे तेथे
प्रत्येकाला कृत्रिमरीत्या प्राणवायू पुरविण्याशिवाय अन्य पर्यायच नाही… त्या म्हणतात साधारणपणे २०१५ साली त्यांची भेट ‘परमवीरचक्र’ विजेते कॅप्टन बानासिंग यांच्या सोबत झाली. कॅप्टन बानासिंग यांनी सियाचीनमधील पाकच्या ताब्यात असलेली चौकी भारताच्या ताब्यात घेण्यासाठी आणि भारताचे प्रभुत्व तेथे प्रस्थापित करण्यासाठी मोठी भूमिका बजावली होती तेव्हा त्यांच्या कडून सियाचीन मधल्या विषम परिस्थितीविषयी जाणून घेता आले. बोलताना कॅ. बानासिंग अगदी सहज म्हणाले की “बहनजी, वहां तो साँस लेना भी मुश्कील है..। क्योंकी वहा तो ऑक्सिजनही नहीं हैं..।” हे त्यांचं वाक्य खरं तर प्रचंड धक्कादायक होतं. मग आम्ही दोघांनीही (सुमेधाताई व त्यांचे पती ) सियाचीन प्रदेशाचा अभ्यास करण्यास सुरुवात केली तेव्हा आम्हाला जाणवलं की युद्ध किंवा चकमकींपेक्षा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे येथे जास्त जीवितहानी होत असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट जाणवली ती म्हणजे येथे अहोरात्र कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा होणे गरजेचे आहे आणि तो तेथेच निर्माण करणे तर सर्वांत जास्त आवश्यक आहे. त्यामुळे मग तेथे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची गरज आमच्या लक्षात आली…
सुमेधाताई चिथडे या सैनिकपत्नी आणि सैनिक माता असल्यामुळे त्यांनी सैनिकी जीवन फार जवळून अनुभवले आहे. आपल्या जवानांसाठी आपण काहीतरी खारीचा वाटा उचलावा अशी इच्छा बाळगून त्यांनी तब्ब्ल अडीच कोटी रुपयांचा ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ सियाचेन येथे उभा केला…
सियाचीनमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचा प्लांट उभारता येईल यासाठी सुमेधाताई चिथडे यांचे पती श्री योगेश चिथडे यांनी संशोधन सुरू केले.
या सर्व प्रकल्पात योगेश चिथडे यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याचे सुमेधाताई सांगतात. त्या म्हणतात की, “योगेश चिथडे यांनी ऑक्सिजन प्लांट कोणता असावा त्याची वैशिष्ट्ये काय तो भारतातून घ्यावा की परदेशातून मागवावा याचा सखोल अभ्यास केला तेव्हा आमच्या लक्षात आले की तेथे सर्वांत अत्याधुनिक प्लांट उभारणेच गरजेचे आहे कारण त्याशिवाय तेथील भारतीय सैन्याची गरज भागणार नाही.. मग अत्याधुनिक प्लांटही जर्मनीहून मागविण्याचे ठरवले. मात्र त्यासाठी सुमारे अडीच कोटी रुपये खर्च येणार आहे खरं तर हा आकडा ऐकून पहिल्यांदा आम्हाला प्रचंड ताण आला होता कारण मध्यमवर्गीय कुटुंबाने एवढे पैसे कधी बघितलेही नसतात. मात्र आता हाती घेतलेले काम अर्धवट सोडायचे नाही हे मात्र निश्चित होते.
२०१५ पासून ‘सर्व्हिस बिफोर सेल्फ’ हा पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनसह असलेला एक कार्यक्रम त्यांनी तयार केला त्यामध्ये भारताची तिन्ही सेनादले, त्यांचा त्याग, त्यांचं शौर्य, त्यांचा पराक्रम समाजासमोर मांडला सोबतच सैन्यदलांमध्ये काम करण्यासाठी किती प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत हे देखील त्यात सांगितलं कारण देशाच्या खऱ्या हिरोंना समाजासमोर मांडण्यासाठी आपणच काम करणे गरजेचे आहे.. राज्यभरात असे कार्यक्रम करुन निधी संकलन केले. विशेष म्हणजे समाजानेही आमच्यावर विश्वास ठेवून भरभरून दान दिलं.. त्यानंतर मग जवळपास साडेतीन वर्षांनी म्हणजे ४ ऑक्टोबर, २०१९ रोजी सियाचीनमध्ये ऑक्सिजन प्लांट कार्यरत झाला. त्यावेळी नॉर्दर्न कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल वाय. के. जोशी उपस्थित होते… प्लांट सुरू झाल्याच्या दिवशी एका जवानाने सुमेधाताई यांना जे सांगितलं ते ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं – “बहनजी, आपने तो भगवान का काम किया हैं…” यावर सुमेधाताई म्हणतात “त्या जवानाची ही प्रतिक्रिया माझ्यासाठी सर्वांत अमूल्य आहे. कारण काहीतरी केल्याचं समाधान आम्हाला त्यातून मिळालं.” …. या प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ’ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी दखल घेऊन कौतुकही केलं.
या ऑक्सिजन प्लांटद्वारे आज एका मिनिटाला २४० लीटर प्राणवायूचं उत्पादन होत असून तेथे कार्यरत सुमारे हजारो लोकांना त्याचा लाभ होतो आहे त्यामुळे यापुढेही भारतीय सैन्यदलांसाठी विविध प्रकल्पांवर काम सुरूच ठेवणार असल्याचे सुमेधाताई अभिमानाने सांगतात.
केंद्र सरकार आवश्यक त्या उपाय योजना करते मात्र नागरिक म्हणून ती आपलीही जबाबदारी आहे या भावनेने सुमेधाताई व त्यांचे पती श्री. योगेश चिथडे यांनी सियाचीन मध्ये भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे शिवधनुष्य यशस्वीरीत्या पेलले आणि हे शिवधनुष्य आजही त्या निःस्वार्थीपणे पेलत आहेत…हा प्रकल्प जननिधीतून उभा राहिला हे त्या विनम्रपणे सांगतात. त्यांच्या कार्याची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील घेतली आहे. हे कार्य अविरत सुरु राहावे आणि समाजाला राष्ट्रकार्यार्थ प्रेरित करावे म्हणून त्या व्याख्यानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी जातात. लोकांनी स्वेच्छेने दिलेला निधी प्रकल्पास जोडतात आणि जनजागृती करतात….
स्वतःच्या वलयात गुर्फटलेले आपण समाजभान विसरत चाललो आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुमेधा ताईंनी सैनिकी जीवनाची दाहकता समाजापुढे ठेवली आणि समर्थ रामदास स्वामी यांचा आदर्श बाळगून पावन भिक्षा मागितली त्यावेळेस अनेकांनी मुक्त हस्ताने अर्थसहाय्य करून त्यांच्या उपक्रमास हातभार लावला.
देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो’ हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे उदगार..!
या वक्तव्याला
अनुसरून कृती करणा-या सुमेधाताई.
वेद समजला नाही तरी चालेल पण त्यांच्यातील वेदना समजून घ्यायला हव्यात.. गेल्या अनेक वर्षांपासून अविरतपणे हा उपक्रम त्यांनी सुरु ठेवला आहे..
त्यांना मनोमन सलाम
नातीगोती अनेक तर्हेची असू शकतात… नातीगोती माणसांची माणसांशीच असतात असेही नाही तर ऋणानुबंध चकोराचे, चंद्रकिरणांशी किंवा चातकाचे मृग नक्षत्रात बरसणार्या पहिल्या-
पहिल्या टपोर थेंबाशीही असू शकतात नाही का ? इतकच नाही तर नाते कधी रक्ताचे तर कधी स्नेहबंधनातून निर्माण झालेले असूही शकतात …
नात्याचा लौकिक प्रकार कोणताही असला तरी ज्या ॠणानुबंधनातून आत्मिक अलौकिकतेचा आनंद झिरपून मनाला नि:स्पृह निर्माल्यतेची अवस्था प्राप्त होत असते त्या स्नेहबंधाचे धागे मनामध्ये फार खोलवर गुंतलेले आणि अतूट असतात.. शब्दातीत असतात…शब्दांत न सामावू शकणारा…
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
