*साहित्य प्रेरणा कट्टा आजगावचे समन्वयक ज्येष्ठ साहित्यिक भोवतालकार विनय सौदागर लिखित अप्रतिम लेख*
*बुद्धपौर्णिमेच्या निमित्ताने*
‘बुद्धपौर्णिमेचा’ दिवस आला की, मला गौतम बुद्धां संबंधीची गाणी आठवतात. प्राथमिक शाळेत असताना बुद्धपौर्णिमेला आम्ही ‘ बुद्ध गौतमका संदेश जगको सुनाओ’,’तू स्वयं दीप हो..’अशी गाणी रेडिओवर आवर्जून ऐकायचो. पुढे गौतम बुद्ध हे नाव मी दशावतारासंदर्भात ऐकले. या भगवंताच्या नवव्या अवतारा संदर्भात अनेक उलटसुलट चर्चाही ऐकल्या, वाचल्या. मग हायस्कूलमध्ये गेल्यावर मात्र बुद्धांचे नाव बाबासाहेब आंबेडकरांशी जोडलेले ऐकले. अनेक दलित मित्रांनी बौद्ध धर्म स्विकारले हेही कळले. या सर्व माहितीमुळे मी बुद्धांना दलितांशी जोडून टाकले आणि आपला हा विषय नाही, असा समज करून घेऊन डोक्यातून बुद्ध हा विषय निर्बुद्धपणे काढून टाकला.
पुढे मग बर्याच वर्षानी स्वामी विवेकानंद, आचार्य रजनीश यांसारख्यांचे तत्वज्ञान वाचताना, समजून घेताना बुद्धांविषयी आकर्षण वाटू लागले. मग मी त्यांचे संदर्भातील पुस्तके जाणीवपूर्वक वाचू लागलो. माझे गैरसमज दूर होत गेले. यात नंतर एवढा बुडलो की, माझ्या बोलण्यातील विषयात बुद्ध डोकावू लागले. माझे एक स्नेही जे आमचे वैद्यकीय अधीक्षक होते ते तर एकदा मला म्हणालेच की,”सौदागर, तुम्ही बौद्ध धर्म स्विकारताय की काय?” अर्थात माझ्या डोक्यात तसे काही नव्हतेच. मग मी,’ धर्म मनाने स्विकारायचा असतो, ते कर्मकांड नाही.’ असे एक पुस्तकी उत्तर त्यांना देऊन टाकले.
या वाचनातच मला “विपश्यना’ हा शब्द गवसला. विपश्यना हा दुख मुक्तीचा एक उपाय. गौतम बुद्धांनी तो आपल्याला दिलाय. ते मी शिकून घेण्यासाठी इगतपूरीला जाण्याचा प्रयत्न सुरू केला. पण कोल्हापुरातच हातकणंगले जवळ एक विपश्यना सेंटर असल्याचे मला कळले .मग तिथे जाऊन बारा दिवसाच्या शिबीरात मी विपश्यना पद्धती शिकून घेतली.
ध्यान मार्गावर अनेक प्रकार आहेत, त्यातलाच तो एक प्रकार असावा ,असे मला वाटते. पुढे मी जे. कृष्णमूर्तींच्या तत्वज्ञानात अधिक रुची घेतल्याने विपश्यनेचा सराव मागे पडला.
आज या सगळ्या गोष्टीकडे वळून बघताना मला असे वाटते की, गौतम बुद्धांना आपण नीट समजूनच घेतलेले नाही. कारण काहीही असो, त्यांचेपासून आपण दोन हात जरा दूरच राहिलोय. जसे आपण राम, कृष्ण समजून घेतो, तसेच बुद्ध ही समजून घ्यायला हवेत, असे आज मला प्रामाणिकपणे वाटते.
*विनय सौदागर*
आजगाव, सावंतवाडी
9403088802

