*ज्येष्ठ लेखिका पत्रकार मेघा कुलकर्णी उर्फ “मेघनुश्री” लिखित अप्रतिम लेख*
*उत्तीर्ण*
नुकताच उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला. काही कालावधीनंतर माध्यमिक शालान्त परीक्षांचे निकालही जाहीर होतील. या सगळ्यांतून पालकांची व विद्यार्थी/विद्यार्थीनीची धावपळ सुरू असते. यानंतरची महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया आणि करिअरची निवड याचा ध्यास आधीपासूनच लागलेला असतो. उत्तम शिक्षण देण्यासाठी पालक दिवसरात्र मेहनत करत असतात. अनेकदा परीक्षक म्हणून काम करताना हे जाणीवपूर्वक लक्षांत येते की, पूर्वीइतके काहीच सोपे राहिलेले नाही. शिक्षणाच्या वेगवेगळ्या पॅटर्नमुळे गृहपाठाची संकल्पना अर्थातच बदललेली आहे.
गृहपाठामुळे शाळेत लिहून घेतलेले सर्व पुनश्च चांगल्या अक्षरांत लिहून त्या वह्या जमा करून घेतल्या जायच्या, तपासून मार्कस् दिले जायचे. त्यामुळे घरी आल्यावर त्या त्या विषयाचे दुसऱ्यांदा लेखन व्हायचे. सराव तर नियमीत व्हायचाच. लिहिण्यामुळे उत्तरे लक्षांत राहणेस मदत व्हायची. आज विद्यार्थीवर्ग लिहिण्याच्या बाबतीत खूपच कंटाळा करत आहेत. गप्पा मारत गृहपाठ पूर्ण करण्याची सवय लागते आहे. केवळ काही मार्कस् पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची ही केवलवाणी धडपड पाहिली की शिक्षकवर्गालाही कीव येते.
उत्तम गुणांकन आयुष्यांत बरीच सफलता प्राप्त करून देते. शालेय/महाविद्यालयीन स्तरांवर मार्गदर्शक हेच पदोपदी सांगत रहातात. रोजचा केलेला नियमीत अभ्यास आणि परीक्षेचे तीन तास यांचे गणित अचूक जमून येते आणि येथेच यशाला पर्याय उरत नाही. करीअरच्या अनेक संधी आता उपलब्ध होत आहेत. त्याचसोबत नवी दालनं खुली होत आहेत. प्रत्येकाला शिखर गाठणे शक्य नाही, किंबहुना स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आजमितीला विशेष प्रयत्न करावे लागत आहेत. जेथे सरावाचा अभाव असतो तेथे मात्र निभाव लागणे खरोखरच कठीण होऊन बसते. मग मनांत येते ती परीक्षेची अनाहूत भिती हे भय मानसिक तणावाचा भाग होण्यास वेळ लागत नाही.
सध्या अजून एक गोष्ट लक्षांत येते ती म्हणजे काळाची गरज म्हणून सध्या भ्रमणध्वनीची संख्या ही विद्यार्थीगणिक आहे. या फोनचा उपयोग मात्र सतत केला जातोय तोही पुस्तकांतील पाने फोटो स्वरूपांत घेणेसाठी. पण या सगळ्यांत त्याचा, न वाचण्यासाठी उपयोग होत न लेखनासाठी. फक्त स्वत:जवळ नोटस् आहेत याचे समाधान विद्यार्थ्याकडे असते. पण या सगळ्याचा परीक्षा सभागृहांत काहीच उपयोग होत नाही. कारण नियमानुसार सर्व साहित्य सभागृहाच्या बाहेर असते. त्यावेळी इतरांकडे लक्ष वेधले जाते, तसेच उत्तराची तारांबळ उडाल्याशिवाय रहात नाही.
यासाठीच वर्षाच्या सुरवातीपासून शाळा/महाविद्यालये यांच्या वाचनालयाचा उपयोग होणे गरजेचे आहे. विशेषतः आठवड्यांच्या परीक्षा प्रथम-द्वितीय सत्र या सगळ्याची तयारी यांकरीता अभ्यासक्रमांतील संदर्भग्रंथांचा वेळोवेळी नोटस् काढण्यासाठी, अचूक उत्तरे तयार करण्यासाठी निश्चितपणे उपयोग होतो. परीक्षेच्या वेळी दुसर्याचे उत्तर बघून लिहिण्यात जो वेळ जातो, त्यापेशा प्रश्नाचे उत्तर आपल्या भाषेत वेगळ्या शब्दांत लिहिता आली तर परीक्षकालाही असा पेपर तपासताना वेगळा आनंद मिळतो, त्याचे फलित स्वरूप योग्य गुणांकन असते.
केलेले परिश्रम, घेतलेले कष्ट कधीच वाया जात नाहीत. उदा : एखादे चांगले कार्य हातून घडताच त्याचे फलित स्वरूपही चांगले लाभते. हा झाला अभ्यासाचा भाग. या सगळ्या सोबत संगतही चांगली असली पाहिजे. पालक जेव्हा एखाद्याबरोबर हिंडणे-फिरणेची मनाई करतात त्यामागे त्यांचा चांगला हेतू असतो. पण याचवेळी विद्यार्थी घरच्यांबद्दल मनांत अढी ठेवून बसतात. एवढेच सांगावे किंवा सुचवावेसे वाटते, आयुष्याच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर विचारधनाची संगत जास्त मूल्यवान ठरते.
©मेघनुश्री [लेखिका,पत्रकार]
भ्रमणध्वनी : ७३८७७८७५१२
