*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री राधिका भांडारकर लिखित अप्रतिम लेख*
*1 मे जागतिक कामगार दिन का साजरा करावा?*
कामगार या शब्दाचा जेव्हा मी विचार करते तेव्हा माझ्या मनात सहज येतं की मी ४० वर्षं एका राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी केली. ज्यावेळी आमच्या विविध मागण्यांसाठी संप वगैरे होत असत त्यावेळी संपाच्या ठिकाणी अथवा संपासंबधित वितरण होणाऱ्या पत्रकात *कॉम्रेड्स* असे आम्हाला संबोधित करत. *कॉम्रेड* याचा अर्थ कामगार पण केवळ इंग्लिश शब्द वापरल्यामुळे त्या शब्दाला एक भारदस्तपणा अथवा वलय प्राप्त होते आणि याच गोष्टीचं मला काहीसं वैषम्यही वाटायचं आणि गंमतीचं हसूही यायचं. आम्ही कामगारच आहोत असे म्हणण्यात मला तरी कधी कमीपणाचे वाटले नाही.
कामगार म्हणजे जी व्यक्ती उत्पादन प्रक्रियेत सहभागी असते आणि त्या बदल्यात मजुरी किंवा वेतन मिळवते ती व्यक्ती कामगार. आर्थिक उत्पादन प्रक्रियेत अशा व्यक्तींचा समावेश होतो. यामध्ये शारीरिक, व्यावसायिक आणि तांत्रिक काम करणाऱ्या सगळ्यांचाच समावेश असतो. यात बांधकाम, कारखाना कामगारांसोबतच शिक्षक, डॉक्टर, आयटी व्यावसायिकांचाही समावेश होतो. थोडक्यात वेतन घेऊन सेवा देणारे जे जे कोणी आहेत ते सारेच कामगार आणि या सर्वच कामगारांच्या श्रमाचे मूल्य समाजाने जाणलं पाहिजे आणि त्यांच्या सेवेचा योग्य तो सन्मान राखला पाहिजे या उद्देशातून कामगार दिन पाळला जातो आणि सामाजिक जीवनामध्ये या सर्वच कामगारांच्या महत्त्वाच्या योगदानाविषयी आदर आणि कृतज्ञता जाणून कामगार दिन साजरा करणे हे नक्कीच उचित आहे, आवश्यक आहे.
आता कामगार दिन हा *एक मे* रोजीच का साजरा केला जातो? त्यामागे एक इतिहास आहे. सतराव्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्याचबरोबर नव्या समस्या उद्भवल्या. समस्या अर्थातच कामगारांच्या होणाऱ्या शोषणाविषयी होत्या. अक्षरश: जनावरांसारखं, वेळेची मर्यादा ही न राखता त्यांना श्रमवलं जायचं. मोबदलाही अल्पसाच असायचा. त्यांच्याच श्रमावर यांच्या हवेल्या उभ्या रहायच्या. परिणामी कामगारांनी संघटित होऊन आंदोलन पुकारले. याचेच पडसाद अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातही उमटले. शिकागो मधील “हेय” मार्केटमध्ये संप आणि मोर्चा निघाला असता त्यांच्याशी पोलिसांनी अत्यंत माणुसकीहीन वर्तन केले. आंदोलकांनीही मग पोलिसांवर बॉम्बस्फोट केले. त्यात काही पोलीस मारले गेले आणि काही आंदोलकांना त्या कारणे फाशीची शिक्षाही देण्यात आली. या घटने विरुद्ध जगभर संतापाची लाट उसळली. मात्र एक मे १९८० रोजी ही चळवळ यशस्वी झाली. चांगली वागणूक, न्याय्य वेतन, पगारी रजा आणि आठ तास काम या त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. तत्पूर्वी १९०४ मध्ये झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संघपरिषदेने जगभरातील कामगार संघटनांना *एक मे* हा दिवस काम करण्यासाठी आठ तासाचा दिवस म्हणून पाळण्याचे आवाहन केले. भारतीय मजदूर किसान पक्षानेही एक मे १९२३ रोजी सर्वप्रथम कामगार दिन साजरा केला आणि कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी लाल ध्वज फडकवण्यात आला. या कामगार चळवळीला असा विस्तृत जागतिक इतिहास आहे आणि माणुसकीच्या दृष्टीतून त्यांच्या श्रमाचे मूल्य जाणून त्यांच्या कामाविषयीच्या तासांचे, वेतन मूल्यांचे तसेच त्यांचे आरोग्य कौटुंबिक समस्यांचा सर्वार्थाने विचार करून एक कायदेशीर आराखडा केला गेला आणि तो मालक आणि नोकर यांच्यामध्ये कायदेशीरपणे राबवलाही जातो आणि म्हणूनच *एक मे* हा जागतिक कामगार दिन म्हणून मोठ्या प्रमाणात,कामगारांचा एक महत्त्वाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
वर्षानुवर्षे इतिहासाचे स्मरण करून श्रमदिन म्हणून हा दिवस पाळताना, जाणीवपूर्वक काही प्रश्न मात्र आजही मनात उपस्थित होतात. त्यातलं महत्त्व आणि गांभीर्य जाणत असतानाही पुन्हा नव्याने पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधावीशी वाटतात.
श्रमिक कामगारांसाठी कायदे झाले, संघटना निर्माण झाल्या, त्यांच्या समस्यांची चर्चा, मागणी एका कायदेशीर मंचावरून होऊ लागली, उपाय सुचवले गेले, त्यांच्या जीवनाला नीटनेटका, सुबद्ध आकार मिळाला पण हे नक्की किती प्रमाणात आणि कोणाला? आजही अनेक असंघटित श्रमिक आहेत. वरच्या आणि खालच्या पातळीवर. सुरक्षिततेपेक्षाही लाचारी काही ठिकाणी अजूनही जाणवते. अजूनही खाजगी व्यवसायांतर्गत कामगारांचे शोषण होताना दिसते. जिथे कामाचे तास, वेळेवर पगार, इतर जीवनावश्यक सुविधांची उणीव जाणवते. जेव्हा आपण एखाद्या दुकानात खरेदी करायला जातो तेव्हा तिथे तासनतास उभे राहून ग्राहकांना सेवा देणारे कामगार पाहताना वाटते की यांना कामगार कायद्याची माहिती आणि ज्ञान आहे की नाही किंवा असूनही त्याचा त्यांना काही उपयोग होतो की नाही आणि नसेल तर त्या मागे असणारी लाचारी आणि पर्यायाने शोषण हे रोखायला नको का? हे एक सर्वसाधारण उदाहरण आहे. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. बालकामगारांचाही प्रश्न सुटलेला नाही. त्यातूनही पळवाटा आहेतच.
एकदा एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मुलाला मी सहज विचारले,” तुझे वय काय रे!”तेव्हा तो चटकन म्हणाला,” मी १९ वर्षाचा आहे.”
तो चक्क खोटं बोलत होता. त्याला मालकाने तसंच पढवलं असणार,खोटे जन्मदाखलेही बनवले असणार, हे समजत होतं म्हणूनच अशा पार्श्वभूमीवर *एक मे* कामगार दिनाचे महत्त्व फार जाणवतं. कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी, निस्वार्थपणे भांडणारे मधु लिमये, एसएम जोशी, नारायण लोखंडे आणि असे कितीतरी.. यांच्यासारखे सच्चे नेते निर्माण व्हायला हवेत. हा कामगार दिन अशासाठी साजरा करायचा की, इतिहासाची आठवण, वर्तमानातल्या परिस्थितीचा अभ्यास आणि कामगारांसाठी चांगल्या भविष्याची वाटचाल याचा पुन:श्च आणि बदलत्या काळाप्रमाणे कोणती पावलं नव्याने उचलणं गरजेचं आहे याचा संघटित विचार झाला पाहिजे. पुन्हा पुन्हा कायद्यातल्या त्रुटी तपासून पाहणं, कायदा पाळला जातो की नाही हा *एक मे* कामगार दिन साजरा करण्याचे उद्दिष्ट असायला हवं.पुरुष आणि महिला कामगारामधील समानता, सवलती यांचाही आढावा या दिनानिमीत्त घेतला जावा तरच कामगार दिन साजरा करण्याचे उद्दीष्ट सफल होईल असे मला वाटते.
राधिका भांडारकर पुणे
