*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन- रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*ईप्सित*
रविकिरणांचा स्वर्ण-पसारा, आवरता अवनीवरूनी
संध्यासमयी लक्षदीपांनी निघाला, आसमंत उजळूनी
सुवर्ण कळसाने मंडित, शिखर राऊळाचे
अवघ्या मंदिरावरी साम्राज्य, पवित्र केशरियाचे
शांत, सोज्वळ मुखचंद्रावर का,
अभ्र गांभीर्याचे
मनांगणीही का तसेच असावे, संभ्रम चिंतेचे
@भारती महाजन-रायबागकर
दीपमालेच्या प्रतिबिंबाची,
नक्षी किती सुंदर
का न तियेचेही प्रतिबिंब, उमटले मुद्रेवर?
संथ वायुलहरी कंपने, जलतरंगांची उठविती
मनसरीतेतील विचारलहरी, का स्पर्धा त्यांच्याशी करिती
हृदयावरती पसरले का, सावट तमसाचे?
दीपांसंगे दूर जावे का, तिमिर दुरितांचे?
भक्तीभावयुत श्रद्धा-संचित, करील ईप्सित पूर्ण
‘शुभम् भवतु’ वदे गंगामाई, मूक आशिर्वच देऊन
@भारती महाजन-रायबागकर
चेन्नई
©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

