वृत्तसंस्था:
अलिकडच्या काळात मोबाईलचं मुलांचं प्रचंड वेड लागलंय. मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहून प्रत्यक्षात तशी कृती करण्याचा बरीचशी मुलं प्रयत्न करत असतात. मोबाईलच्या आहारी गेलेली मुलं काय काय करू शकतात, या विचारच न केलेला बरा. धुळ्यातही असाच एक प्रकार समोर आलाय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील तुकारामवाडीमधील हर्षल उर्फ सोन्या दीपक कुंवर या 13 वर्षांच्या मुलानं मोबाईलमध्ये व्हिडीओ पाहून आत्महत्या केल्यानं खळबळ उडालीय.
एका मुलानं वेबसाईटवर जन्मतारीख टाकून मृत्यू कधी आणि कसा होतो हे पाहिलं आणि गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवल्यानं आजूबाजूच्या परिसरातील सर्वच हादरलेत.
हर्षल हा शिंदखेडा तालुका धुरे येथे वास्तव्याला होता. तो आठवीच्या वर्गात शिक्षणाचे धडे गिरवत होता. लॉकडाऊनमध्ये तीन ते चार महिन्यांपासून हर्षल तुकाराम वाडीतील त्याचे मामा दीपक भदाणे यांच्याकडे राहायला आलेला होता. मामा दीपक यांचा कपडे इस्त्रीचा व्यवसाय असल्यानं ते बऱ्याचदा कामानिमित्त बाहेरच असायचे. हर्षल आणि त्याची आजी प्रमिलाबाई या घरी असायच्या.