देवी लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी होऊन ७ भाविक ठार
पन्नास हून अधिक जखमी : १५ जणांची प्रकृती गंभीर
दोडामार्ग
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील प्रसिद्ध देवी लईराईच्या जत्रोत्सवात आज शनिवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली. यात ७ भाविकांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जखमी झाले आहेत. यातील १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत घटनेचा आढावा घेतला. तसेच डीचोली, बांबोळी इस्पितळात जाऊन मृतांच्या नातेवाईकांची व जखमींची भेट घेऊन विचारपूस केली.
प्रत्यक्षदर्शीमी दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षीपेक्षा यंदा लईराईच्या जत्रेत मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अग्निदिव्य कार्यक्रम सुरू असताना अचानक चेंगराचेंगरी सुरू झाली. यावेळी गर्दीत अनेक जण खाली पडले. यात श्वास कोंडल्याने ७ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक जखमी झाले आहेत. घटना घडली त्यावेळी पोलीसही मोठ्या संख्येने हजर होते. मात्र गर्दी आटोक्यात आणणे अशक्य झाले.
या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तातडीने डिचोली आरोग्य केंद्रात दाखल झाले. या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या जखमींची त्यांनी विचारपूस केली. तसेच प्रशासकीय यंत्रणेला तातडीने आवश्यक ते मदतकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी बांबोळी इस्पितळात जाऊन जखमींची भेट घेतली.
यावेळी तहसीलदार अभिजीत गावकर, उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर,श्रीपाद माजीक हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. डिचोली आरोग्य केंद्राच्या डॉ. सिद्धी कासार व त्यांच्या टीमने तातडीने जखमींवर उपचार सुरू केलेत.
लईराईच्या जत्रेतील चेंगराचेंगरीतील जखमी भाविकांना आज पहाटे चार वाजल्यापासून म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात सुरुवात झाली. आतापर्यंत तीसहून अधिक भाविकांना दाखल करण्यात आले असून यातील चौघा जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंत्री नीलकंठ हळणकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार प्रेमेद्र शेठ, उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांच्यासह पोलिसांनी उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमींचे कुटुंबीय, नातेवाईक व मित्रमंडळी मोठ्या संख्येने दाखल झाले होते.
लईराईच्या जत्रेत स्टॉल करण्यात आले आहेत. चेंगराचेंगरी वेळी यातील काही स्टॉलवर भाविक पडले. त्यावेळी स्टॉलला पुरविण्यात आलेल्या वीज केबल्सना भाविकांचा स्पर्श होऊन अनेकांना शॉक असल्याची माहितीही समोर आली आहे.
शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेला आपण चौकशीचे आदेश दिले आहेत असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. मृतांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच जखमींची विचारपूस केली. पुढील तीन दिवसांसाठी सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
या घटनेमुळे शिरगाव गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेनंतर भाविकांची धावपळ सुरू झाली. नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी व त्यांचे पथक करत आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे.
जत्रेतील चेंगराचेंगरीत मृतांमध्ये सूर्या मयेकर (साखळी), आदित्य कवठणकर व तनुजा कवठणकर (दोघेही अवचित वाडो थीवी), यशवंत केरकर (माडेल थीवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे), सागर नंदरणे (माठवाडा पिळगाव) यांचा समावेश आहे. मृतांमध्ये आदित्य व तनुजा कवठणकर हे काकू व पुतण्या असून एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
