*कोकण मराठी साहित्य परिषद कडून आमदार दीपक केसरकर यांचा सत्कार*
सावंतवाडी (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्य चळवळ पुढे नेण्याचे काम करत आहे. अनेक वर्षे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आपण सर्वच आग्रही होतो. आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. आपली बोलीभाषा आपण सर्वांनी टिकवली पाहिजे. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेला साहित्य चळवळ व मराठी भाषा संवर्धनासाठी आपण निश्चितपणे सर्वतोपरी सहकार्य करेन, असे मत राज्याचे माजी शालेय शिक्षण तथा मराठी भाषा मंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. श्री केसरकर यांनी मराठी भाषा मंत्री असताना मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्रस्तरावर विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या बहुमूल्य योगदानासाठी त्यांचा कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेतर्फे मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल श्रीफळ देऊन कोमसाप सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष संतोष सावंत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी सचिव प्रतिभा चव्हाण, सहसचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सावंतवाडी येथे मार्च महिन्यात कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन पार पडले. या साहित्य संमेलनाचे आमदार दीपक केसरकर हे स्वागताध्यक्ष होते. या साहित्य संमेलनाच्या वेळी आमदार केसरकर यांचा कोमसाप तर्फे सन्मान होणार होता. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे त्यांना त्यावेळी उपस्थित राहता आले नसल्याने सावंतवाडी येथील बॅरि.नाथ पै व्यासपीठ येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
यावेळी श्री केसरकर म्हणाले, कोकण मराठी साहित्य परिषदने सावंतवाडीत घेतलेल्या जिल्हास्तरीय संमेलनाला मला उपस्थित राहता आले नाही. परंतु यापुढे सावंतवाडीत साहित्य चळवळ अधिक व्यापकतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने साहित्यिक उपक्रम, संमेलन घ्यावे त्याला निश्चितपणे माझे सहकार्य राहील. कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य चळवळ व्यापकतेने पुढे नेत आहे. विकास होत असताना साहित्य चळवळही फार महत्त्वाची आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, तिचे अभिजातित्व टिकवण्याच्या दृष्टीने आपण सर्वांनी हातभार लावूया. बोलीभाषेचे जतन होणे गरजेचे आहे आणि ते काम कोकण मराठी साहित्य परिषदेने करावे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव खानोलकर यांनी केले. यावेळी कोमसाप सावंतवाडी कार्यकारिणी सदस्या मेघना राऊळ, विनायक गांवस, माजी नगराध्यक्ष संजू परब, सचिन वालावलकर, ॲड.नीता सावंत कविटकर, अशोक दळवी, गजानन नाटेकर आदी उपस्थित होते.

