You are currently viewing अक्षय तृतीया

अक्षय तृतीया

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा गझल मंथन समूह सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शोभा वागळे लिखित अप्रतिम लेख*

 

*अक्षय तृतीया*

 

वैशाख शुध्द तृतीया म्हणजेच अक्षय तृतीया. साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. जैन धर्मामध्ये याला “आखा तीज ” म्हणतात. ह्या दिवशी बऱ्याच योगीच्या जयंती ही साजऱ्या करतात. जसे परशूराम जयंती, बसेश्वर जयंती, अन्नपूर्णा जयंती.

तसेच या दिवशी व्यास मुनीनी “महाभारत” ह्या महान ग्रंथाच्या रचनेला प्रारंभ केला आणि त्या ग्रंथाच्या लेखनिकाचे काम गणपतीने केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

 

उत्तराखंडमध्ये असलेल्या बद्रीनारायण देवळाचे दार आजच्या दिनी उघडतात व दिवाळीच्या भाऊबीजेच्या दिवशी ते बंद करतात म्हणे.

 

वृंदावन मध्ये असलेल्या बांकेबिहारीच्या मंदिरात फक्त आजच्या दिवशी श्री विग्रहाचे चरण दर्शन होत असते. बाकी पूर्ण वर्ष ते वस्त्राने झाकलेले असतात.

 

बरेच लोक आजच्या दिवशी श्री परशूरामाची

पुजा करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा धरणीवर अवतरली अशी आख्यायिका आहे.

 

आजच्या तिथीस केलेले दान, हवन क्षयाला जात नाही म्हणून “अक्षय तृतीया ” असे म्हटले जाते. आजचा दिवस पूर्वजांच ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो म्हणून खीर, पन्हे, चिंचोणी, पापड, कुरड्या व सुगंधी पाण्याचा घट ब्राम्हणास दान करून पितरांकडून आशीर्वाद मिळवतात.

 

चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना करून पुजा करतात. बायकांना हळदी कुंकूवाला बोलवून हळद कुंकू लावून फुल,गजरा देतात व आंब्याची डाळ, भिजवलेला हरभरा आणि पन्हे देतात. हा चैत्रातला हळदीकुंकू समारंभाचा गौरी उत्सवाची सांगाता अक्षय तृतीयेला होत असते.

 

कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा करतात. मृत्तिकेबद्दल कृतज्ञ भाव ठेवून शेतात आळी घालतात. कोकणात या दिवशी बियाणे पेरण्याची प्रथा आहे आणि या दिवशी पेरलेले धान्याला अमाप पीक येणार अशी धार्मिक समजूत कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये आहे. आजच्या दिवशी आळी करून लावलेल्या झाडा फुलांना भरघोस फल प्राप्ती होईल अशी ही समजूत आहे.

 

आजच्या दिवशी शुभकार्याचा क्षय होत नाही म्हणून नवीन घरात प्रवेश करणे, नवीन आर्थिक व्यवहार सुरू करणे, नवीन वस्तू विकत घेणे, नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने यांची खरेदी करणे हे अक्षय तृतीयेच्या दिवशी लोकं आवर्जून करतात.

 

अशा या शुभ दिनाच्या “अक्षय तृतीयेच्या” सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

*****************************

 

शोभा वागळे

मुंबई.

8850466717

प्रतिक्रिया व्यक्त करा