पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांना नोंदणी बंधनकारक.
कणकवली
३ ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांना नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या केंद्रांच्या नोंदणीची सुविधा education.maharashtra.g ov.in या संकेतस्थळावर वेब लिंकमध्ये उपलब्ध असलेल्या ‘Pre-School Registration Portal’ (ECCE) या टॅबवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे त्यामुळे पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या खासगी केंद्रांनी या पोर्टलवर पुढील सात दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आल्याचे परिपत्रक २४ एप्रिल रोजी काढण्यात आले आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अनुसार 5+3+3+4 आकृतीबंधातील पहिली ५ वर्षे म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेची ३ वर्षे (वयोगट ३ ते ६) व इयत्ता पहिली आणि इयत्ता दुसरी (वयोगट ६ ते ८) यांचा समावेश आहे. या ५ वर्षाच्या टप्याला ‘पायाभूत स्तर’ असे संबोधण्यात आले आहे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर केंद्र शासनाने तयार केला असून त्यावर आधारित राज्य अभ्यासक्रम आराखडा पायाभूत स्तर राज्याने तयार केला आहे.
सद्यस्थितीत वय वर्ष ३ ते ६ वयोगटातील बालकांना अंगणवाड्या, बालवाड्या, शाळेला जोडून पूर्व प्राथमिक वर्ग व खासगी पूर्व प्राथमिक वर्ग यामधून शिक्षण दिले जाते. शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाड्या व अंगणवाड्या यांची नोंदणी व माहिती महिला व बालविकास विभाग यांच्याकडे उपलब्ध आहे तथापि, खासगी पूर्व प्राथमिक वर्गाचो अधिकृत माहिती शासनाकडे नाही. पूर्व प्राथमिक शिक्षण देणाऱ्या सर्व खासगी केंद्रांची माहिती एकत्रित स्वरुपात राज्य, जिल्हा तसेच पालकांनाही उपलब्ध असणे आवश्यक आहे. यासाठी वयोगट ३ ते ६ यांना शिक्षण देणारे केंद्र Pre. School, Nursery, Jr. K.G., Sr. K. G., पूर्व प्राथमिक वर्ग अशा कोणत्याही नावाने सुरु असलेल्या, खासगी केंद्रांची नोंदणी करण्यासाठी Pre School Registration पोर्टल शासनाकडून सुरु करण्यात आले आहे. यामध्ये खासगी केंद्रांची सर्वसाधारण माहिती, व्यवस्थापन, विद्यार्थी संख्या, भौतिक सुविधा, कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याची माहिती द्यायची आहे.

