You are currently viewing मौनी आत्मचिंतन

मौनी आत्मचिंतन

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते यांच्या काव्याचे कवयित्री ऐश्वर्या डगांवकर यांनी केलेलं रसग्रहण*

 

*मौनी आत्मचिंतन*

🎍🎍🎍🎍🎍🎍

मिटल्या पापण्यात आता

साक्षात्कार तो दिव्यत्वाचा

ब्रह्माण्ड हेच रूप दयाघनी

स्पर्श कृपाळु आत्मतत्वाचा

 

भक्ती भावनांचीच गंधफुले

तेजाळे मांगल्याचा गाभारा

हे रुपडे कृपावंती कनवाळू

सचैल साक्षात्कार शुचितेचा

 

वैखरीवरी पाझरता तो हरि

गोकुळी घुमतो स्वर राधेचा

मंत्रमुग्ध सारे सारेच चराचर

सृष्टीतुनी भास परमात्म्याचा

 

स्पंदनांना ओढ ती मुक्तीची

न आसक्ती ध्यास विरक्तीचा

भाळी , तोची प्रसाद चिरंतर

गंगौघ मौनी आत्मचिंतनाचा

🎍🎍🎍🎍🎍🎍🎍🎍

*24 एप्रिल 2025 ( 39 )*

*©️ वि.ग.सातपुते.( भावकवी )*

📞 *( 9766544908 )*

 

*विगसा यांच्या कविते बद्दल दोन शब्द*

———————————-

आता डोळे मिटून जेंव्हा जेंव्हा आत्मचिंतन करतो तेंव्हा तेंव्हा मिटल्या पापण्यांच्या आड फक्त ईश्वराचाच भास होतो.दूसरे काही दिसत नाही एवढा जीवाला त्याचा ध्यास लागला आहे.सर्व ब्रम्हांड त्यानेच व्यापलं आहे.त्याचा कृपाळु स्पर्श हृदयी जाणवत आहे.

 

भक्तीभावनेच्या फुलांचा गंध अंतरात दरवळला आहे.अंतरात्म्याच्या म्हणजेच ईश्वराच्या तेजाने हृदयाचा गाभारा पवित्र झाला आहे.ईश्वराचे ते दयाळू रूप पाहून मन शुद्ध झाले आहे सचैल म्हणजे वस्त्रासहित स्नान .याचाच अर्थ असा की शरीर हे आत्म्याचे वस्त्र.ईश्वराच्या प्रचिती ने आत्म शुद्ध झाला अंत:करण पवित्र झालं आहे.

 

अशा शुद्ध झालेल्या अंत:करणातून जेव्हा हरिनाम

उच्चारले जाते तेव्हा तो स्वर गोकुळात घुमतो व राधेला मोहवून तिचाच स्वर होऊन जातो .सारे चराचर

म्हणजेच सृष्टी मंत्रमुग्ध होऊन

सर्वदूर त्या परमात्म्याचा भास होतो.सर्व सृष्टी ईश्वरभक्तीत लीन होऊन जाते.

 

अशा अवस्थेत प्रत्येक श्वासागणिक त्या परमपित्याची ओढ लागते.जीवाशिवाच्या भेटीसाठी संसाराच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी आत्मा अधीर होतो.त्यावेळी त्याला कुठलीही माया अथवा पाश अडवू शकत नाही.कारण त्याच्या मनातील आसक्ती दूर होऊन विरक्ती चे भाव जागृत झाले असतात.

अखेर नशिबात तोच खरा सत्य आहे.त्यालाच सदा प्रसाद मानून गंगेच्या प्रवाह प्रमाणे निरंतर आत्मचिंतनात लीन व्हायचे असते.हे कवीवर्यांना सुचवायचे आहे.

 

*सौ ऐश्वर्या डगांवकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा