You are currently viewing स्थलांतर…

स्थलांतर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*

 

*स्थलांतर…..*

 

विषय पाहिल्यावर वाटले आपण लिहावेच.

कारण स्थलांतर हा जीवनाचा स्थायीभाव आहे.

टी व्हीवर नेहमी फ्लेमिंगोंचे स्थलांतर पाहतो, तसे अनेक पक्ष्यांचेही पाहतो. मैलोनमैल हे पक्षी

स्थलांतर करतात कारण ती जगण्याची मागणी असते. थंड बर्फाळ प्रदेशातून उष्ण प्रदेशात कधी

अती उष्ण प्रदेशातून मानवेल अशा हवामानाच्या प्रदेशात हे पक्षी दरवर्षी हजारो किलोमिटरचा प्रवास करतात व आपले आयुष्य वाचवतात.

पुन्हा मूळ प्रदेशात परत आपल्या घरी जातात.

आहे ना मजा.. माणूस आपल्या मूळघरीच परत

जातो.त्याला त्याचीच ओढ असते मग तो इतरत्र

कितीही फिरून येऊ दे. त्याची पाळंमूळं मूळ घरातंच रहातात, खरं ना?…

 

वडील वारल्यावर माझी आई एकटीच कापडण्याच्या त्या घरात रहात होती. म्हणायची, “ माझी मी बरी आहे या घरात”. हो तिचे आयुष्यच त्या घरात गेले होते ना? तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला, ..असे असले तरी…

 

तिने काही कमी स्थलांतरे केली नव्हती! स्वातंत्र्य

चळवळीचे धुळे जिल्ह्याचे म्होरकेच माझे वडील असल्यामुळे माझ्या जन्मापर्यंत त्यांना स्थैर्य नव्हते.

४२ च्या चळवळीत चांदा, बांदा, दिल्ली, आग्रा

पोलिसांच्या ससेमिरा पाठीशी असल्यामुळे सारखे धावत होतेच पण रात्रीतून कधी तीन घरे

बदलावी लागत असत इतके पोलीस पाळतीवर

असत. म्हणून मी म्हटले स्थलांतर हा जीवनाचा

स्थायीभाव आहे.

 

विचार करा.. आपण जन्मल्यापासून किती स्थलांतरे करतो. मी मूळची कापडण्याची. राहिले का कापडण्यात? इ. १० वी पर्यंत फक्त

कापडण्यात राहिले. मग पुढच्या शिक्षणासाठी

धुळ्यात आले. पुढे लग्न झाले, काही दिवस

आमच्या गावी कमखेड्याला गेले. आणि मग

नोकरी मिळताच नवऱ्याबरोबर नाशिकला स्थिरावले ते आजतागायत इथेच आहे. तुमच्याही प्रत्येकाच्या जीवनात ही स्थित्यंतरे

व स्थलांतरे घडलीच आहेत ना? माझा मोठा

मुलगा एम डी झाला नि ९७ ला थेट इंग्लंडमध्ये

गेला. आता तो तिथलाच झाला. आपल्या अरूणाताई, ठाण्याहून थेट अमेरिकेत गेल्या. म्हणून तर त्यांना हा विषय सुचला. आपली सोनाली ताई आमच्या धुळ्यातून थेट बांद्र्यात

गव्हर्मेंट कॅालनीत जाऊन पडली व मायाताई

आता वरूडमधून थेट नागपूरची गरम हवा खात

आहेत. स्थलांतर नाही कुणाच्या जीवनात?

पोटामागे माणूस जिथे जातो तिथेच स्थिरावतो.

 

माझ्या कॅालेजच्या मैत्रिणी कुठे आहेत बिचाऱ्या

माहित नाही.त्यांची स्थलांतरे झाली की नाही माहित नाही.माझा मोठाभाऊ मुंबईला तर बहिण अनेक जिल्हे फिरून धुळ्यात स्थिरावली होती.

भारतभरातून दररोज हजारो रेल्वे गाड्या माल ओतावा तशा मुंबईत माणसे ओतत असतात हे

शेकडो वर्षे चालू आहे. मला नवल वाटते तरी

मुंबई समुद्रात सांडत कशी नाही. तिच्यात एवढी

माणसे मावतात कशी? हे न सुटणारे कोडे आहे.

ही प्रक्रिया अजून किती वर्षे चालणार आहे माहित नाही. न सांडो बिचारी. डब्यात हलवून

हलवून पापड भरतो तशी आपण तीत माणसे

भरू पण मुंबईला माणसे जाणार म्हणजे जाणार!

 

आमचे कापडण्याचे कितीतरी लोक सुरतला

स्थलांतरीत झाले ते आता अर्धे गुजराती बनले

आहेत.माझे अनेक नातलग अमेरिका, ॲास्ट्रेलिया, जपान, कॅनडात आहेत. नशिब त्यांचे, दुसरे काय? जिथे स्थलांतर नशिबात

लिहिले आहे तिथेच माणूस जाणार ना? स्थलांतर ही जीवनाची गती व प्रगतीही आहे.

पोटासाठी, नोकरीसाठी स्थलांतरे होतात व

माणसे त्या गावची होऊन जातात. आता आमचा पत्ताच नाशिक आहे. कदाचित पुढच्या पिढ्यांना आमची मूळगावे माहितही नसतील. अख्खा कोकण ओस पडला आहे. सारे मुंबईत स्थिरावले आहेत.सण आले की पळतात व रेल्वे

त्यांना कोकणात ओततात. परत घेऊन येतात.

म्हणून स्थलांतर गती व प्रगतीही आहेच. नाहीतर

कामा अभावी लोक खेड्यातच दारू व तंबाखू

चोळत टाळ्या पिटत बसले असते नाही का?

 

वस्तू हलली की करपत नाही, म्हणून ती फिरली

पाहिजे. भाकरी करपते, घोडा पडला की उठत

नाही. तसेच माणसे ही एका जागी बसली की

गंजतात. ती हलली पाहिजेत,त्यांनी हातपाय

हलवले पाहिजेत, गरज पडल्यास कां कू न करता गाव व देशही बदलायची तयारी ठेवली

पाहिजे. म्हणून स्थलांतर गरजेचे आहे.किंवा

जीवनाची ती मागणी आहे…

“ थांबला तो संपला”

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा