You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ल्याची पडझड थांबवावी….

सिंधुदुर्ग किल्ल्याची पडझड थांबवावी….

माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेची पुरातत्त्व विभागाकडे मागणी.

वैभववाडी

‘सिंधुदुर्ग पाण्यामध्ये किल्ला …….हे शब्द कानावर पडताच समस्त सिंधुदुर्गवासीयांची मान अभिमानाने ताट होते. अशा या आपल्या जिल्ह्यातील जलदुर्गाची वर्तमानस्थितीत होणारी पडझड थांबवावी अशी मागणी ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ या संस्थेच्यावतीने महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे केली आहे.
वरील विषयाच्या संदर्भाने आम्ही ‘माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट’ संस्थेच्यावतीने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, मालवण शहरामधील ऐतिहासिक ‘सिंधुदुर्ग किल्ल्या’ ची आज पडझड होत आहे. मालवण शहरातील बंदराच्या पश्चिमेस असलेला कुरटे बेटावरील छ. शिवाजी महाराजांनी २९ मार्च १६६७ साली या जलदुर्गाची वास्तुशांती केली. त्याकाळी तब्बल एक कोटी होन खर्च झाले. ४८ एकर क्षेत्रातील हा जलदुर्ग अजूनही अभेद्य आहे. देशविदेशातून लाखो पर्यटक त्यास भेट देत असतात. शिवप्रेमी वारंवार त्याची स्वच्छता करीत असतात. परंतु आता असे निदर्शनास येते की, तटाच्या भिंतीना वड, पिंपळाची झाडे , झुडपांनी आपली पाळेमुळे पसरवली आहेत. त्यामुळेही तटबंदी आतून ठिसूळ होत चाललेली आहे . भविष्यात या ठिसूळपणामुळे तटबंदीला धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यातील किल्ल्याच्या सुरक्षिततेचा विचार करून यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, असे आम्हाला वाटते.
आधुनिक काळातील तंत्रज्ञान वापरून या झाडांमुळे तटबंदीला धोका पोहोचणार नाही अशी योजना होणे गरजेचे आहे. तरी पुरातत्त्वखात्याने याबाबत लक्ष घालावे, अशी विनंती आहे.


जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी संस्था सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहेत.
आज किल्ल्यास ३५० वर्षे होऊन गेली आहेत. एकमेव शिवराजेश्वर मंदिराचा मंडप १९०६ ते १९०७ च्या सुमारास करवीरकर छ. शाहूनी बांधला होता. या किल्ल्यासारखा दुसरा किल्ला भारतात नाही. महाराजांचा हा ऐतिहासिक पराक्रमाचा ठेवा या पडझडीतून जीर्ण होऊ नये, एवढीच आमची धारणा आहे.
या डागडुजी सोबतच तिथे येणाऱ्या पर्यटकांचा विचार करून काही प्राथमिक सुविधा जसे की, सार्वजनिक स्वच्छतागृह, महिलांसाठी एखादे विश्रांती स्थान हे होणेही गरजेचे आहे. तसेच कचरा कुंडीची व्यवस्था व कच-याची विल्हेवाट लावणे. बरेचदा पर्यटक एकदा किल्ल्यात गेल्यावर जवळपास तीन तास थांबत असतात. तीन तासांमध्ये अनेक वयोगटातील स्त्री-पुरुष पर्यटक म्हणून आलेले असतात. अशावेळी त्यांची कुचंबणा होते. विशेषतः लहान मुलं,वृद्ध माणसे, गर्भवती स्त्रिया यांची गैरसोय जास्त होत असते. त्यामुळे या प्राथमिक गरजांचा विचार व्हावा, असेही आम्हाला सुचवावेसे वाटते. या पत्राची प्रत मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. खासदार संभाजीराजे, कोल्हापूर मा. जिल्हाधिकारीसो, सिंधुदुर्ग व मा. सरपंच वायरी-मालवण यांना पाठविण्यात आल्या आहेत.


आपण या सर्व बाबी लक्षात घेऊन लवकरच या किल्ल्याच्या दुरुस्ती व संवर्धन उपाययोजनेची सुरुवात करावी अशी विनंती माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रकाश भाऊ नारकर व सचिव प्रा. श्री.एस.एन पाटील यांनी मेलव्दारे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा