You are currently viewing मिश्र भावभावनांचा सुंदर मेळ : मला कवीचा चष्मा लागला

मिश्र भावभावनांचा सुंदर मेळ : मला कवीचा चष्मा लागला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे यांच्या काव्यसंग्रहवरील कविवर्य- श्री उद्धव भयवाळ लिखित पुस्तक परिचय लेख*

 

******

*मिश्र भावभावनांचा सुंदर मेळ : मला कवीचा चष्मा लागला {काव्यसंग्रह}*

*परीक्षण : उद्धव भयवाळ, छत्रपती संभाजीनगर*

*****

 

कवी, लेखक, बालसाहित्यिक आणि समीक्षक या नात्याने वाचकांना सर्वदूर परिचित असलेले साहित्यिक आणि अनेक पुरस्कारांचे धनी असलेले अरुण वि. देशपांडे यांचा ‘मला कवीचा चष्मा लागला’ हा बत्तीसावा कवितासंग्रह अलीकडेच प्रकाशित झाला. हे त्यांचे ७८ वे पुस्तक आहे.

 

‘मला कवीचा चष्मा लागला’ या काव्यसंग्रहात एकूण ८३ कविता आहेत.

 

कवी अरुण देशपांडे यांनी मनोगतामध्ये म्हटल्याप्रमाणे तंत्रशुद्ध कविता लेखनासाठी जो अभ्यास लागतो, त्याचा अभाव ही त्यांच्यातल्या कवीची मर्यादा ते ओळखून असल्यामुळे ते छंदोबद्ध, वृत्तबद्ध कविता किंवा गझल रचना लिहू शकलेले नाहीत. तरीही त्यांनी कवितेचा आकृतिबंध सांभाळून अभंग, ओवी आणि मुक्तछंद अशा स्वरुपात काव्यलेखन केलेले आहे.

 

या काव्यसंग्रहातील ‘शब्द वश या वेड्याला’ या पहिल्याच कवितेत,

 

वाटचाल आयुष्याची

वळणदार खडतर ती

मनात असावी कविता

पुरणारी शिदोरी ती

 

या ओळींमधून, आयुष्याची वाटचाल कितीही खडतर असली तरी कवितेची शिदोरी सदैव सोबत असावी अशी अपेक्षा कवीने व्यक्त केली आहे.

 

त्याचप्रमाणे, ‘कवितामाहात्म्य’ या कवितेमध्ये सुद्धा कविता आपल्या आयुष्याशी कशी जोडलेली असते हे खालील ओळींमधून समजते

 

अस्वस्थ मनास स्थिरता

देऊ शकते ती कविता

भावनांचे प्रतिबिंब असते

सहज सुंदर ती कविता

 

संयत, संयमी असते कविता

मनाची समजूत घाले कविता

जीवनसार सांगते कविता

पथदर्शनी असते ही कविता

 

‘मला कवीचा चष्मा लागला’ या कवितेच्या या खालील ओळी पहा,

 

मला कवीचा चष्मा लागला

डोळ्यांना खोल नजर आली

वरवर पाहणे ते चुकीचे

सारा कचरा साफ झाला

 

मला कवीचा चष्मा लागला

माझ्यातच फरक पडला

नीट समजून घ्यावा माणूस

शोधबोध हा मजला जाहला

 

माणूस समजून घेत असतांना, माणसाला कवीच्या नजरेतून पाहतांना जी समज येते, त्याचे सुंदर आणि यथार्थ वर्णन या कवितेत केलेले आहे.

 

‘आपली मराठी’ या कवितेच्या खालील ओळींमधून मराठी भाषेचा अभिमान बाळगून मराठी भाषेतच व्यवहार करण्याचे सुचविण्यात आले आहे.

 

मायमराठीचा गौरव आता

त्रिभुवनी होई जरी साजरा

बाहेर बोलण्याची वेळ येता

का घेशी हिंग्लिशचा आसरा

 

आतापर्यंत अनेक कवींनी डोळ्यांच्या भाषेची महती सांगितली आहे. या कवितासंग्रहातील ‘डोळे’ ही कवितासुद्धा डोळ्यांच्या भाषेबद्दल बरेच काही सांगून जाते.

 

उदाहरणार्थ,

 

डोळे असतात बोलके

शब्द होतात कधी मुके

चेहरा ठेवा किती कोरडा

डोळ्याकाठी पाणी रुके

 

मनातले सांगतात डोळे

समजण्या ते सोपे असते

शब्द लागत नाहीत त्यांना

शब्दाविना असते सांगणे

 

श्रावणगाणी, माझी दुनिया, मनात असले तरी, मस्त पावसात, मित्र, कविता माणसांची, वाचूया पुस्तकं, या आणि इतर सर्वच कविता म्हणजे मिश्र भावभावनांचा मेळ आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.

 

कविवर्य अरुण देशपांडे यांना पुढील लेखनप्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

 

———-

 

-पुस्तक परिचय-

*मला कवीचा चष्मा लागला*

(कवितासंग्रह)

कवी – अरुण वि. देशपांडे

प्रकाशक- संवेदना प्रकाशन, पुणे

पृष्ठे ९६, मूल्य १५० रुपये

 

 

 

*उद्धव भयवाळ*

१९, ‘इंद्रधनू ‘

शांतीनाथ हाऊसिंग सोसायटी,

गादिया विहार रोड,

शहानूरवाडी,

छत्रपती संभाजीनगर ४३१००९

मो. ८८८८९२५४८८

प्रतिक्रिया व्यक्त करा