*साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव व र. ग. खटखटे ग्रंथालयाचा संयुक्त उपक्रम*
वेंगुर्ला :
सुप्रसिद्ध साहित्यिक कै.जयवंत दळवी जन्मशताब्दी प्रीत्यर्थ आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्टा आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या खुल्या साहित्य चर्चेत आज जयवंत दळवी यांच्या ‘सूर्यास्त’ या कादंबरीवर तसेच नाटकावर चर्चा करण्यात आली.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक तथा नामवंत कवी श्री.विनय सौदागर यांनी या कादंबरीचे व नाटकाचे कथानक सांगून ‘सूर्यास्त’ कादंबरीतील व नाटकामधील फरक स्पष्ट केला.कै.जयवंत दळवी यांच्या अन्य कादंबऱ्यांपेक्षा आणीबाणीची पार्श्वभूमी असलेली ‘सूर्यास्त’ ही कादंबरी वेगळी असल्याचे निरीक्षण त्यांनी यावेळी बोलताना नोंदवले.कादंबरीमधील निवडक तथा रोचक भागाचे वाचनही यावेळी सौदागर यांनी केले.
चोखंदळ वाचक श्रीमती सरोज रेडकर व खटखटे ग्रंथालयाच्या साहाय्यक ग्रंथपाल सौ.प्राची पालयेकर यांनीही ‘सूर्यास्त’ विषयी आपली मते व्यक्त केली.
या कार्यक्रमात सचिन दळवी, गजानन मांद्रेकर, अनिल निखार्गे, जयदीप देशपांडे, अर्चना लोखंडे, अनिष्का रगजी, एकनाथ शेटकर, रोमन फर्नांडिस, नरेंद्र सामंत, शरद परुळेकर, सुनंदा परुळेकर, विजय परुळेकर, विनया परुळेकर, प्रकाश मिशाळ, प्रशांत रेगे व उदय पार्सेकर यांनी भाग घेतला.
खुल्या साहित्य चर्चेतील तेविसाव्या पुस्तकावरील या चर्चेच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले,तर शेवटी अर्चना लोखंडे यांनी ऋणनिर्देश केला. एकोणीस रसिक वाचक चर्चेत सहभागी झाले होते.
