*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम लेख*
फळांचा राजा आंबा
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो
आंबा हा विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे फळझाड आहे. या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. आशियामध्ये हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे.
कोकणचा राजा म्हणजे हापूस आंबा… देवगड हापूस, रत्नागिरी हापूस आणि वेंगुर्ला हापूस.. यांची चव एकदा चाखून पाहिल्याशिवाय कळणार नाही.
कोकणातील आंब्याच्या बागा…? नाही कोकणची आमराई…
या आमराईचे वर्णन कुठून आणि कसे करावे…?
एकदा आमराईत शिरल्यावर माणसाचे मन प्रसन्नतेने काटोकाठ भरून जात. जणू चैतन्याचा हापूस आंबा सुहासिक चवदार रसवंती होऊन ओसांडून वाहू लागतो. …उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा सूर्य आग ओकतो आणि धरती तापते तेव्हा एक सुगंध हळुवारपणे वाऱ्यावरून तरंगत येतो. हा सुगंध असतो फळांचा राजा आंब…! त्याच्या नुसत्या वासानेही मन प्रसन्नतेने ताजतवान होतं… आणि जिभेला पाणी सुटते… आंबा हा केवळ एक फळ नाही तर तो एक विलक्षण सुंदर स्वर्गीय सुखाचीअनुभूती आहे.
अरे आंब्याच्या मोहराचा घमघमाट पसरला आहे. झाडांवर फुललेला तो फुलोरा मन वेधून घेतो, त्याचा दरवळणारा मंद गंध वाऱ्यावर तरंगत नागिणीसारखा सळसळतो आहे. कधी झाडाच्या फांदीवर झोके घेत.. आम्रपानांना स्पर्श करत… मोहराच्या फुलोऱ्यातून धरती कडे धाव घेतो. वैशाखाच्या उन्हाने भाजलेल्या अवनीच्या भेगाळलेल्या मनावर अलगद फुंकर मारतो. या हिरव्यागार आमराईत पिवळसर पांढऱ्या फुलोऱ्या आड पानांमध्ये बसून कोकीळ कुहू- कुहू गात आहे. त्याच्या मधुर आवाजाने आमराई संगीतमय झाली आहे.
या हिरव्याकंच निसर्गरम्य गारव्यात मन वाऱ्यासवे उंधडू लागलं. अरे ! ही आंब्याची छोटी छोटी बाळे माकडाचे पिल्लू आईच्या पोटाला पकडून लोंबकळतात तशी.. घोसा घोसाने लोमकळत आहेत. पण मग ती अशी टकमक का बघत आहेत..? अरे..! तुम्हाला पाहून तर आंबट गोड कैरीचं लोणचं आठवत… कच्ची कैरी कापून तिखट मीठ लावून खाताना तर डोळ्यात पाणी तरळतं.. जीभ मात्र मिटक्या मारत आंबट तिखट ताजा आस्वाद घेऊ लागते. पण ताज्या कैरीचे पन्ह हे आपण कसे विसरणार..? वैशाखाचा दाह कमी करणारे.. जीवाची तहान भागवणारे स्वादिष्ट थंड पन्न.
कैरी मध्ये गुंतलेलं मन …आमराईच्या गच्च हिरव्या दाटीतून.. जमिनीपर्यंत पोहोचू पाहणार पिवळं सोनेरी उन्हाची किरणे उंच सखल जमिनीवरून अडखळत चालत होती. तो सावल्यांचा लपंडाव बघत आनंदाने वेडावलं होतं.
आहा ..आहा..! हा तर पायरीचा आंबा.. या फळांचा रंग बदलू लागला आहे. अर्धवट पिकलेला वास नाकावाटे थेट शरीरात शिरून मनाला स्पर्श करत आहे. पायरी हा आंबा चवीला गोड आणि रसाळ असतो. टोकाला बारीक चोच असलेला हा आंबा लवकर पिकतो.
अरे हे समोर उभे असलेले झाड मांकुराद-.. जरी याचे उत्पादन गोव्यात अधिक असले (गोवा मांकुराद) तरी कोकणातही तो आढळतो.
हा तर कोकणचा राजा मोठ्या ऐटीत उभा आहे. ही जात वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राने विकसित केली आहे. हापूस आणि टॉमी एटकिन्स या जातीच्या संकरातून ती तयार झाली आहे.
कोकण रुची ही जात लोणच्यासाठी चांगली मानली जाते. आणि ही झाडे केशर आंब्याची आहेत जरी ही जात मूळची गुजरातची असली तरी कोकणात तिची लागवड मोठ्या प्रमाणात होते.
हे हळुवार डुलणारे झाड रत्ना- हा आंबा हापूस आणि नीलम या दोन जातीच्या संकरातून तयार करण्यात आला आहे.
रायवळ आंबे ,गावरान आंबे, हे हापूस व्यतिरिक्त कोकणात अनेक स्थानिक जातीचे आंबे आढळतात. आकाराने आणि चवीने वेगवेगळे असतात. या मोठाल्या आंब्यापासून आंबट गोड मुरंबा बनवतात.
अरे ही तर सर्व झाडे हापूस आंब्याचीच आहेत… हा कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाचा आंबा आहे. याला आंब्याचा राजा असेही म्हणतात. हापूस आपला विशिष्ट स्वाद , सुगंध
आणि रंगासाठी जगभर ओळखला जातो.
या हापूस आंब्याबरोबर घरातील आंब्याची आढी आठवली. म्हणजे एका खोलीत माचं करून त्यावर गवत पसरून त्यात पिकत घातलेले आंबे… त्याचा घमघमाट दूरपर्यंत पसरतो. अशा नैसर्गिक पिकवलेल्या आंब्याला एक नैसर्गिक सुगंध असतो आणि रंगही पिवळसर फिकट हिरवा असतो.
आता तर तोंडाला पाणी सुटलं कारण याची चव अवीट मधुर असते इतर सर्व फळांपेक्षा अप्रतिम… त्याचे गुण सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण आहेत.. म्हणूनच त्याला राष्ट्रीय फळाचा दर्जा दिला आहे.
यापासून अनेक पदार्थ बनतात. –
मुरंबा, जाम, जेली ,चॉकलेट , पन्ह, लोणचे, सरबत, आमरस ,जाम ,मँगो मिल्कशेक, आईस्क्रीम ,आंबापोळी, आंबा बर्फी ,वडी बनवली जाते.
महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये काही सणांना आंब्याच्या पानाचे तोरण झेंडूच्या फुलांमध्ये ओऊन घरच्या मुख्य दरवाजाला लावतात. आंब्याच्या पानांचा वापर शुभकार्यात आवर्जून केला जातो. याच्या लाकडापासून फर्निचर बनवतात तर हे डेरेदार झाड अनेक वाटसरूंना सावली देते.
हापूस चा केशरी पिवळा रंग त्यावरची लालसर झाक या त्याच्या सौंदर्याला एक जणू सोनेरी सुगंधीत झळाळी असते. हिरव्या रंगातून तो सोनेरी केशरी छटा मध्ये न्हावून निघतो
जणू काही निसर्गाने त्याच्यावर रंगाची उधळणच केली आहे. त्याचा सुगंध अ हा हा..! जणू आसमंत दरवळतो..
आंबा म्हणजे निसर्गाने दिलेले कोकणाला एक वरदान नाही.
दमल्यावर झाडाखाली सावलीत बसून तो आंबा खाण्याची मजा काही औरच आहे. पिकलेला आंबा अलगद पिळला की त्याचा गोड रस हळूहळू तोंडाच्या दिशेने सरकतो .. आंब्याच्या रसाने बरबटलेले हात … आणि केशरी आमरसाने माखलेलं तोंड… मग जणू स्वर्गीय आनंद…
आंबा म्हणजे केवळ फळ नाही तर ती संस्कृती आहे… कोकणच्या मातीचा आत्मा आहे.. इथल्या माणसांच्या परिश्रमाचे प्रतीक आहे. इथल्या माणसाच्या प्रेमाचा ओलावाही…
चोखंदळ खवय्यांच्या जिभेवर रेंगाळणारी स्वर्गीय अविट अशी चव आहे… म्हणूनच तो खऱ्या अर्थाने कोकणचा राजा आहे…. या हापूस आंब्याने निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणाला वेगळी अशी एक ओळख दिली आहे…
सौ .स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग

