*ज्येष्ठ लेखिका कवयित्री अनुराधा जोशी लिखित अप्रतिम लेख*
*मखरातली चैत्रगौर*
फाल्गुनातली होळी व गावाकडचा शिमगा संपल्यावर चैत्राची लगबग सुरू होते.
गुढी पाडवा, नुतन वर्ष, श्रीराम नवमी, हनुमान जयंती अशा मोठ्या धार्मिक सणांबरोबरच चैत्रगौर ही तृतियेला मखरात बसवतात.
गौर माहेरी येते म्हणजे कौतुक सोहळाच असतो.
हीच्या कौतुकासाठी निसर्गही सज्ज होतो.
स्वत,: ऋतुराज वसंतच आगमन करतो.
आम्रवृक्ष मोहरतात. कोकिळेला सुस्वर असा कंठ फुटतो. पक्षांचा किलबिलाट सुरू होतो कारण आता कडक थंडीचा शिशिर संपलेला असतो.
झाडे झुडपे पानगळ थांबवतात व जागोजागी नविन चैत्र पालवी फुटते. कळ्या फुलांनी तरूवेली बहरून येतात.
सुगंधाची पखरण करत जाई जुई सोनचाफा, गुलाब मोगरा अनंत पानोपानी फुलायला लागतात.
नुकतीच झाडांना बाळ कैरी, चिकू फणस अननस, रातांबे लगडुन झाडे लेकूरवाळी होतात. जांभुळ फुलून त्यावरही घोस लटकायला सुरवात होते.एकंदरीत सृष्टी चैतन्याने भारून जाते. नवा तजेला ठाई ठाई दिसू लागतो. आसंमंतात सुगंधाची फुलांच्या अनेक रंगाची ऊधळण चालू होते.
पिवळा जॅकरंदा, शुभ्र जाई जुई तगरी, लाल चुटूक देवचाफे, पळस पांगारे, निळे गुलाबी कॅशिया यांचे फूलोरे सौंदर्य वाढवतात.
सारवलेल्या अंगणात चैत्रांगण रेखले जाते. ऊंबरठ्यावर रांगोळी, झेंडूचे तोरण दारी अशी गौरीची स्वागताची तयारी होते.
चैत्र तृतियेला देवघरात जाई जुईने मखर सजते. त्यांत कोणी झोपाळ्यावर, कोणी, चांदीच्या वाटीत, कमळात किंवा छोट्या चौरंगावर गौरीला स्थानापन्न करतात.
गौर माहेरीच आली आहे. मग कौतुकाला कसला तोटा?
रोज नविन फुलांची हार तुरे गजरे रांगोळ्यांची सजावट,
तिच्या आवडीच्या वस्तु पुढ्यात ठेवल्या जातात. नारळाची वडी, लाडू चकल्या कलिंगड टरबूज काकड्या फळे असे काय काय ठेवले जाते. मांडले जाते.
मग सख्यांना घरी हळदीकूंकवाला बोलावतात.
सजावटीचा मांड मांडतात. गजरे, हळदीकूंकू अत्तर गुलाबपाणी, कैरीचे पन्हे, आंबाडाळ अशा ऊन्हाचा तडाखा कमी करायच्या वस्तुनी स्वागत करतात. मग हरभर्यांनी ओटी भरतात.
हे असे महिनाभर घरोघरी गौरीचे कौतुक चालते.
वैषाख येईल. आधी पिवळा बहावा फुलून त्याची हळदी झुंबरे डूलू लागतील. काहीच दिवसात लाल चुटूक गुलमोहर फुलेल .आणि वर्षाऋतूची चाहुल लागेल.
रस्तोरस्ती गुलमोहर व बहाव्याचे हळदीकूंकवाचे सडे पडतील.
निसर्ग गौरीबरोबर मनसोक्त रंगपंचमी खेळून दमेल
मग वैषाख तृतियेला चैत्रगौर माघारी फिरेल.
इतरही सण साजरे झालेले असतील .
अशी चैत्राची लगबग, निसर्गाची रंग गंधाची ऊधळण, सृष्टीचे चैतन्य, श्रीराम हनुमानाचे ऊत्सव हे सगळे पार पाडत चैत्र आपला निरोप घेईल.
अनुराधा जोशी.
अंधेरी. मुं. 69
9820023605

