कणकवलीत भरला पुन्हा गावठी आठवडा बाजार
कणकवली
गावठी आठवडा बाजार ही संकल्पना पंतप्रधान मोदी यांच्या कृषी विधेयकाना पाठबळ देणारी आहे. शेतकऱ्याला आपला उत्पादित माल थेट ग्राहकांपर्यंत याद्वारे विकता येतो.मुंबई सह मुंबईच्या उपनगरांत गावठी आठवडा बाजार भरवून स्थानिक शेतकऱ्याच्या उत्पादित मालाला मोठी बाजारपेठ मिळवून देणार असल्याचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी गावठी आठवडा बाजार उदघाटन प्रसंगी सांगितले.
कणकवली पं स आणि स्नेहसिंधु कृषी पदविधर संघाच्या वतीने कोरोनाकाळात बंद असलेला गावठी आठवडा बाजार प्रजासत्ताक दिनापासून पुन्हा भरविण्यात आला. आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पं स सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्या हस्ते फित कापून गावठी आठवडा बाजाराचे उदघाटन करण्यात आले. आमदार नितेश राणे यांना गावठी केळीचा घड सभापती रावराणे यांच्या हस्ते भेट देण्यात आला. यावेळी कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, स्नेहसिंधु चे हेमंत सावंत, पं स उपसभापती दिव्या पेडणेकर, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी सभापती दिलीप तळेकर, भाजपा तालुकाध्यक्ष तथा पं स सदस्य मिलींद मेस्त्री, भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप मेस्त्री, जि प उपअभियंता आर पी सुतार, रोटरी प्रेसिडेंट लवू पिळणकर, दादा कुडतरकर, राजू पेडणेकर, सुभाष मालंडकर, आनंद घाडीगांवकर, सूर्यकांत वारंग आदी उपस्थित होते. जि.प.बांधकाम उपविभाग कार्यालय आवारात भरविलेल्या आजच्या गावठी आठवडा बाजाराला तालुक्यातील बचत गट आणि गावठी उत्पादक विक्रेत्यांनी वस्तू विक्रीसाठी मोठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे कणकवली चा मंगळवार आठवडा बाजार असूनही विक्रेत्यांनी भरगच्च उपस्थिती दर्शवली होती. ग्राहकांनीही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद दिला.सोशल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून विक्रेत्यांची बैठक व्यवस्था पं स च्या वतीने करण्यात आली होती. गावठी आठवडा बाजारात भाजीपाला, कुळीथ पीठ, काजू, गावठी तांदूळ, आंबावडी, फणसपोळी, गावठी कोंबडी लाव्हे, कलिंगड, घावणे चटणी, आंबोळी, पुरणपोळी, मसाले, सुरणकांदा, वळेसर आदी पदार्थ उपलब्ध होते. दर शुक्रवारी गावठी आठवडा बाजार भरविण्यात येणार आहे.