You are currently viewing संकल्प

संकल्प

*के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवलीचे लेखक प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे लिखित अप्रतिम लेख*

 

*संकल्प*

मानवी जीवनामध्ये संकल्पाचे अनन्य साधारण महत्त्व आहे. मनापासून केलेली कोणतीही कृती किंवा कार्य हे संकल्पा सारखेच असते. अभिनेता शाहरुख खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात या संदर्भात अतिशय गाजलेला एक डायलॉग आहे. “किसी चीज को तुम दिल से मांगो, तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने में जूट जाती है” दुसरे यासंदर्भात याहून चांगले उदाहरण म्हणजे या राष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या बालसवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य निर्मितीचा संकल्प सोडला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही दृढ निश्चयाने केलेल्या संकल्पाला फळ मिळाले. महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करताना आपल्याला असे अनेक प्रसंग दिसतात कि, हे असे कसे घडले? याचे उत्तर केवळ चमत्कार असेच वाटून जाते. परिणामी आज समाजातील खूप मोठा वर्ग महाराजांना ईश्वर पदी विराजमान करण्यास आग्रही आहे. पण या कार्यसिद्धीमागे त्यांनी दृढ निश्चयाने केलेल्या संकल्पाचेही आपण सतत स्मरण ठेवणे आवश्यक आहे. उदा. महाराज आग्र्याच्या काळ कोठडीतून सुखरुप कसे बाहेर पडले? यासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे आजतागायत इतिहासकारांना भेटलेली नाहीत. त्यामुळे महाराजांच्या जीवनातील या व आशा अनेक प्रसंगाबद्दल इतिहासकारांमध्ये एक वाक्यता आढळून येत नाही.

मित्रांनो जीवनात आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा यशस्वी व्हायचे असेल तर असाच दृढ निश्चयाने केलेला संकल्प, आपण केला पाहिजे. संकल्प जर मनापासून केला असेल तर या सृष्टीतील विविध प्रकारच्या मंगलशक्ती आपल्या संकल्प पूर्तीसाठी मदतीला धावून येतात. मानवी जीवनात संकल्पाला फार महत्त्वाचे अधिष्ठान आहे. संकल्प करण्याआधी प्रत्येकाने स्वतःच्या आवडीचे क्षेत्र निवडावे व आवडलेल्या क्षेत्रात आपल्यातील उत्तमता व प्रतिभेचा उपयोग करत उत्कृष्ट कामगिरी करण्याचा निग्रह करावा. संकल्प करतांना मनाची एकाग्रता व तो पूर्णत्वास जाण्यासाठी बौद्धिक, शारीरिक तंदुरुस्तीची, काटेकोर नियोजनाची आवश्यकता असते. संकल्प हा सकारात्मक असावा. तो स्वतःसह इतरांचे कल्याण करणारा असावा. संकल्प जर मनापासून सोडलेला आणि संकल्प पूर्तीसाठी काटेकोर नियोजन असेल तर यश हे मिळतेच. आपल्या पुराणकथांमध्ये सुद्धा विविध राक्षस हे संकल्प करून सिद्धी प्राप्त करत, पण त्यांचा उद्देश चुकीचा असल्याने अंतिमतः त्याची फळ निष्पत्ती चांगली होत नसे. हे इतिहासातील अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होतांना दिसते. विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या अभ्यासाबद्दल, आपल्या उपक्रमांबद्दल, आपल्या जीवनातील ध्येयाबद्दल, उद्दिष्टाबद्दल, आपल्या करिअर बद्दल अशाच प्रकारे संकल्प सोडला पाहिजे.

संकल्पा बाबत चर्चा करून मी आपणास अंधश्रद्धेकडे घेऊन जात आहे. असे काहींना वाटू शकते. पण हे सत्य नाही. जीवनात मनापासून केलेले, मनाला आवडलेले कोणतेही काम हे संकल्पा सारखेच असते. या संदर्भात काम करताना आपल्याला आळस, थकवा, कंटाळा या गोष्टी जाणवत नाहीत, लक्षातही येत नाहीत. दिवसातले 18 – 18 तास आपण न थकता काम करू शकतो. थोडक्यात ते तुमच्या आवडीचे जिव्हाळ्याचे काम असते. संकल्प म्हणजे असे अजिबात नाही की ते एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक स्थळावर जाऊनच सोडला पाहिजे. जगाच्या कल्याणासाठी केलेली कोणतीही कृती, फक्त ती आवडीने किंवा ध्येयाने प्रेरित होऊन केलेली असणं गरजेचं आहे. त्यालाच सद्संकल्प असे म्हणतात. आपल्याला अनुभव येईल, आपल्या कार्यपूर्तीसाठी निसर्गातील अनेक शक्ती आपणास मदत करतांना दिसतील.

धन्यवाद.

लेखक.

प्रा. श्री. प्रशांत पुंडलिक शिरुडे

के. रा. कोतकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली

9967817876

prashantshirude1674@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा