सावंतवाडी :
बांधकाम व्यावसायिकांची देशपातळीवरील सर्वात मोठी आणि प्रभावी संघटना असलेल्या ‘क्रेडाई’ च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीवर युडी -टिपी (म्युनिसिपल कॉऊन्सिल, प्लॉटिंग, बीपीएमएस) को-कव्हेनिअर म्हणून क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांची २०२५-२७ कार्यकालासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे तळ कोकणातील व्यवसायीकाला राज्यस्तरीय मंचावर सलग ६ व्या वर्षी प्रतिनिधित्व मिळाले आहे. क्रेडाई ही रिअल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिकांना एकत्रित करून त्यांच्या समस्या, गरजा आणि विकासासाठी काम करणारी संघटना आहे. भारतात २१ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या या संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी अलीकडेच जाहीर झाली. या कार्यकारिणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व म्हणून नीरज देसाई यांचा पुनः समावेश करण्यात आला आहे.
नीरज देसाई हे यापूर्वी देखील ‘क्रेडाई एक्सपांशन, सिटी स्ट्रेंदनिंग’ यासारख्या समितीवर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी नवीन क्रेडाई चॅप्टर सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेली होती. त्यामुळे त्यांचा अनुभव व संघटन कौशल्य, आणि क्रियाशील नेतृत्व लक्षात घेता त्यांची आता राज्य समितीवर फेर निवड झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम व्यवसाय सध्या झपाट्याने विकसित होत असून टाऊनप्लॅनिंग व म्युनसिपल कॉऊन्सिल या ठिकाणी परवानगी घेताना अनेक गोष्टींमध्ये अडचणी येत असतात, परंतु आता क्रेडाईच्या राज्य कार्यकारिणीमध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे या सर्व मुद्द्यांवर आता आपल्या जिल्ह्यातील मत अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या राज्यस्तरावर कमिटीवर मांडून त्या वेळप्रसंगी शासन स्तरावर सोडवण्यास मोठी मदत होणार आहे. या निवडीबद्दल क्रेडाई सावंतवाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी नीरज देसाई यांचे अभिनंदन केले. यावेळी श्री. देसाई यांनी आपण जिल्हावासीय बांधकाम व्यावसायिक आणि राज्यस्तरीय बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधी यांच्यातील एक दुवा बनून त्यांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले, तसेच त्यांच्या म्युनसिपल अथवा टाऊन प्लॅनिंग ऑफिस मधील प्लानिंग-प्लॉटिंग, बीपीएमएस प्रणाली संदर्भातील अडचणी समजून घेऊन त्या शासन पातळीवर क्रेडाई महाराष्ट्र मार्फत पोचवून त्या सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील असे सांगितले.

